• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेल्वे स्टेशनला गावांची नावे न दिल्यास उद्घाटनाला ग्रामस्थांचा विरोध

ByEditor

Nov 29, 2023

सिडको, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत रेल्वे प्रशासनाला इशारा

विठ्ठल ममताबादे
उरण :
तालुक्यात दोन ते तीन महिन्यात रेल्वे सेवा सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन नामकरणचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सिडको प्रशासनाने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना तसेच उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांना २९/११/२०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे बैठकीसाठी बोलाविले होते. बैठकीत उरणमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी जोपर्यंत रेल्वे स्टेशनला स्थानिक महसूली गावांची नावे देण्यात येणार नाही तोपर्यंत उरणमधील कोणत्याही रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

नवघर, बोकडविरा, कोटगाव, धुतूम, जासई या गावांची नावे त्या त्या रेल्वे स्टेशनला सिडको किंवा शासनाकडून न दिली गेल्यास वरील गावच्या ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जाईल, असा सज्जड दम सिडकोचे सहव्यवस्थापकीय अधिकारी शांतनू गोयल यांच्यासमोर सर्व ग्रामस्थांनी एका आवाजात दिला. ” गावांची नावे द्या ,नंतरच उरण रेल्वेचे उदघाटन ‌” असे मिटिंगमध्ये स्पष्ट ठणकावून सांगण्यात झाले. बोकडविरा सरपंच अपर्णा मनोज पाटील, जासई सरपंच संतोष घरत, धुतूमचे प्रेमनाथ ठाकूर, उरणचे निलेश भोईर, नवघर ग्रामपंचायत सदस्य विश्वास तांडेल यांच्यासह प्रा. एल. बी. पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, भगवान पाटील, धीरज घरत, रुपाली खंडेश्वर पाटील, यशवंत ठाकूर, सुनील पाटील, नित्यानंद भोईर, माजी जि. प. सदस्य जनुशेठ भोईर, शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे, योगेश तांडेल, नवेल तांडेल, प्रशांत पाटील, सौरभ घरत आदी गावोगावच्या प्रमुख कार्यकर्त्यासह ५७ जणांची उपस्थिती होती. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय अधिकारी शांतनू गोयल यांनी समस्या ऐकून गावांच्या नावांसंबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल हे सांगितले. तसेच पुढची मिटिंग ही सिडको आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांना घेऊन होईल. तसेच स्टेशनवर येणारी नोकरभरतीबाबत केलेली मागणी ऐकून घेतली.

या मिटिंग मधून गावांना नावांचा अधिकार मिळेल आणि नावे दिल्याशिवाय उरण रेल्वेचे उद्घाटन रेंगाळणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सिडको व रेल्वे प्रशासनाने उरण तालुक्यातील विविध रेल्वे स्टेशनच्या नामांतरच्या बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी नवघर, बोकडविरा, कोटगाव, धुतुम, जासई ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!