नव्याने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरील कामगार असुरक्षित
मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीमधील अकरा कामगारांच्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतर देखील महाड औद्योगिक वसाहती मधील कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र औद्योगिक वसाहतीमध्ये जे नवीन प्रकल्प उभे राहत आहेत त्या ठिकाणी आणि कंपन्यांच्या अंतर्गत बांधकाम प्रकल्पांवर काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा धोक्यात असल्याची दिसून येत आहे.

महाड औद्योगिक वसाहती मधील अतिरिक्त औद्योगिक वसाहती मधील प्रताप केमिकल्स या नव्याने उभ्या राहणाऱ्या कंपनीमध्ये कामगार सुरक्षा मंडळ व व राज्य शासनाचा औद्योगिक विकास विभाग ठेकेदारा पुढे झुकल्याचे पाहण्यास मिळाले. महाड औद्योगिक वसाहती मधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटामध्ये ११ कामगारांचा जळून मृत्यू झाला तर पाच हून अधिक कर्मचारी .. गंभीर जखमी झाले होते. मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 30 लाख रुपये कंपनीतर्फे तर जखमी झालेल्या कामगारांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. या दुर्घटेनंतर देखील कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

महाड औद्योगिक वसाहती मधील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये प्रताप केमिकल कंपनीचे नव्याने बांधकाम चालू आहे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची कोणती सुरक्षा व्यवस्था ठेकेदारांकडून होत नाही. या कामगारांकडे कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे नसल्याचे दिसून आले. ठेकेदार देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे या कंपनीच्या चालू असणाऱ्या कामकाजावरून पाहण्यास मिळाले. इमारतीवर उंचीवर काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव धोक्यात घालून काम करण्यास ठेकेदार भाग पाडत आहे. याबाबत त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्याला विचारले असता त्याने कोणतेही ठोस कारण सांगण्यास नकार देऊन सर्वस्वी जबाबदारी ठेकेदाराची असून याबाबत मला काही माहिती नाही असे उडवा उडवी चे उत्तर दिले. मात्र कामगारांची सुरक्षा बघणाऱ्या कामगार मंडळाचे देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे हे स्पष्टपणे कालच्या घटनेवरून पाहण्यास मिळाले.

महाड औद्योगिक वसाहतीमधील बांधकाम प्रकल्पांवरील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची लहान मुले देखील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मुक्तपणे खेळत आहेत या चिमण्यांचे हात सिमेंटच्या गोण्यांवर फिरत आहेत या सिमेंट मध्ये चिमण्यांच्या त्वचेला धोका संभवत आहे तर बांधकाम सुरू असल्याने या ठिकाणी लोखंडी तुकडे, विटा यांच्यामुळे इजा होण्याची शक्यता आहे. ही मुले बालवाडी शाळा यापासून वंचित आहेत मात्र औद्योगिक क्षेत्रातील शाळांचे शिक्षक आणि एमआयडीसी अधिकारी आदी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील काम करणाऱ्या महिलांना देखील सुरक्षा उपाययोजना नाही. महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी कंपन्यांचे प्रकल्प उभे राहत आहेत या प्रकल्पां वर मोलमजुरी करणाऱ्या महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ज्या ठिकाणी या महिला काम करतात त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याच प्रकारची उपाययोजना केलेली नाही. हेल्मेट, हॅन्ड ग्लोज, गॉगल इत्यादी साधने पुरवली जात नाही. या महिलांना पोटाची भूक भागवताना आपल्या बरोबर असलेल्या लहान मुलांचीही काळजी घ्यावी लागते मात्र ज्या ठिकाणी या महिला काम करतात त्या ठिकाणी या मुलांना सुरक्षित राहतील अशी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. नाईलाजास्तव महिलांना मिळेल त्या ठिकाणी मुलांना ठेवून मेहनत करावी लागत आहे.
