अनंत नारंगीकर
उरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवार दि २० पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. मंगळवारी ९ व्या दिवशी कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली.
धुतूम ग्रामपंचायत हद्दीत ज्वलनशील पदार्थ साठवू ठेवणारी इंडियन आईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.हा प्रकल्प आहे. मात्र या प्रकल्पातील रोजगार आणि नोकरीमध्ये येथिल स्थानिकाना योग्य ते प्रतिनिधीत्व दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पात गावातील उच्चशिक्षीत आणि कुशल आणि अकुशल कामगारांना प्रतिनिधीत्व देण्यात यावे यासाठी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांचा कंपनी प्रशासना सोबत संघर्ष सुरू आहे. मात्र कंपनी प्रशासन येथिल प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात टाळाटाळ करत आहे. त्यामुळे धुतूम ग्रामस्थांनी २० नोहेंबर पासून कंपनीच्या गेटसमोर धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर उपसरपंच सौ कविता कुंदन पाटील व सहकारी यांनी बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.या उपोषणामध्ये गावातील २३ प्रकल्पग्रस्त प्रत्यक्षात उपोषणाला बसले होते.
धुतूम गावातील नागरीकांनी एकदिलाने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान सिडको, कंपनी प्रशासन, तहसिलदार आणि पोलिस हे या आंदोलनातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असून अनेक बैठका होवून देखिल यामधून तोडगा निघाला नव्हता. मंगळवारी कंपनी प्रशासन आणि धुतूम ग्रामस्थ यांच्यात अखेर सामोपचाराने चर्चा झाली. यामध्ये इंडियन ऑईल अदानी व्हेंचर कंपनीत कॉन्ट्रक्टमध्ये ३३ अकुशल प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि कंपनीत ज्यावेळेस भरती निघेल त्यावेळेस गावातील सुशिक्षीत बेकारांना पहिले प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले.या उपोषणात सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, सदस्य प्रेमनाथ ठाकूर, सुचिता कडू, चंद्रकांत ठाकूर, स्मिता ठाकूर, प्रकाश ठाकूर, करिष्मा ठाकूर, अनिता ठाकूर, रविनाथ ठाकूर यांच्यासह गावातील माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता. सरपंच सुचिता ठाकूर यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत पाटील, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, संतोष पवार,संजय ठाकूर, उद्योगपती पी जी ठाकूर तसेच सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले आहेत.
