• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गडकोट संवर्धन करणाऱ्या शिलेदारांना निवारा तंबुचे वाटप

ByEditor

Jun 19, 2023

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोलाड लायन्स क्लबचा उपक्रम

विश्वास निकम
गोवे-कोलाड :
समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काही देणं लागतो या निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं आपल्याला समाजात क्वचितच पहायला मिळतात. एका समाजकार्य करणाऱ्या संस्थेने दुसऱ्या समाजकार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप देणं आजकाल पहायला मिळत नाही. जिकडे तिकडे आम्ही कसे श्रेष्ठ याचीच चढाओढ दिसते. परंतू स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांची गडकोटांप्रती असलेली तळमळ पहाता त्यांच्यावर “लायन्स क्लब कोलाड-रोहा” यांच्यावतीने कौतुकाचा वर्षाव करत सामाजिक बांधिलकीचे जतन करत ऐतिहासिक गड कोटांचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या स्थानिक सुरगडाच्या मावळ्यांना एक सुविधा म्हणून निवारा तंबू (टेंट) वाटप करण्यात आले.

कोलाड रोहा लायन्स क्लब ही संथा गेली तीन वर्ष सामाजिक, शैक्षिक, आरोग्य तसेच विविध क्षेत्रात कोलाड परिसरात सामाजिक बांधिलकीचा वसा म्हणून काम करत आहे. यांच्या संकल्पनेतून तसेच क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर सानप व लायन अनिल महाडिक यांच्या विशेष पुढाकारातून लायन्स क्लबच्यावतीने या मावळ्यांना रविवार, दि. १८ जून रोजी डॉ. सागर सानप यांच्या पुई येथील निवास्थानी आयोजित कार्यक्रमात वाटप करण्यात आले.

यावेळी क्लबचे अध्यक्ष डॉ. सागर सानप, उपाध्यक्ष नरेश बिरगावले, डॉ. विनोद गांधी, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार डॉ. श्यामभाऊ लोखंडे, बोर्ड ऑफ डायरेक्टर गजानन बामणे, अलंकार खांडेकर, अनिल महाडिक, नंदकुमार कळमकर, महेश तुपकर, राजेंदर कोप्पु, विश्र्वास निकम, दिनकर सानप, सुधीर भोकटे, विठ्ठल सावळे, स्थानिक सुरगड संस्थेचे संस्थापक अजय भोसले आदी लायन मेंबर्स तसेच सुरगड संस्थेचे पदाधिकारी मावळे बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ. सागर सानप यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, येथील स्थानिक सुरगड संस्था ही येथील सुरगडाचे संरक्षण आणि संवर्धन करत त्यांनी जवळपास वीस मोहीम यशस्वी करत गडावर पाण्याचे टाके स्वच्छ करत असताना तसेच संवर्धन करताना तोफा तसेच दगडी तोफ गोळे तर काही ऐतिहासिक गोष्टी मिळाल्या आहेत तसेच रविवार हा सुट्टीचा दिवस असून तो गड कोट संवर्धन करण्यासाठी आपण सारेजण देत आहात त्याबद्दल या मावळ्यांचे कौतुक केले. तर हा कार्यक्रम घरी घेण्याचा एकच उद्देश की शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्या गडांचे संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या मावळ्यांचे पाय माझ्या घराला लागले तर आम्ही धन्य होऊ असे समाधान व्यक्त केले. नरेश बिरगावले, गजानन बामणे, अलंकार खांडेकर, अनिल महाडिक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

गेल्याच आठवड्यात म्हणजेच ४ जुन २०२३ रोजी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेला लायन्स क्लब कोलाड रोहा यांच्यावतीने ४ सोलर लाईट पॅनल भेट म्हणून देण्यात आले. आणि त्याच क्रार्यक्रमाच्या वेळी सुरगडाच्या शिलेदारांनी केलेल्या सुरगडावरील संवर्धन कार्याची माहीती घेत लायन्स क्लब कोलाड रोहाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सागर सानप व अनिल महाडिक यांनी गडावर निवारा मुक्कामासाठी चार टेंन्ट (तंबू ) देण्याचे कबुल केले त्याची वचनपूर्तता म्हणून रविवारी १८ जुन २०२३ रोजी डॉ. सागर सानप तसेच त्यांचे सहकारी अनिल महाडिक यांनी आपला दिलेला शब्द पाळला आणि आपल्या राहत्या घरी ( पुई गाव) येथे स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांना आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करून सुरगडावर चालू असलेल्या अखंड अविरत गडसंवर्धनाच्या शिवकार्यात आपला खारीचा वाटा म्हणून चार टेंन्ट स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेला भेट दिले. त्याबद्दल स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्यावतीने संस्थेचे संस्थापक अजय भोसले यांनी लायन्स क्लब कोलाड रोहाच्या सर्व पदाधिकार व पुई ग्रामस्थ यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता आल्पोहार घेऊन करण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!