श्रीवर्धनमध्ये दिव्यांग भवनसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
गणेश प्रभाळे
दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेकडून दिव्यांग भवन उभारावे, अशी मागणी हाेती. या मागणीला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच भवन उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.
श्रीवर्धनमध्ये पाणीपुरवठा योजना व समुद्रकिनारा सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा रविवारी खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याच दिवशी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नगरपरिषद येथे एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांनी सदिच्छा भेट दिली.

दिव्यांग संस्थेच्यावतीने पवार यांना दिव्यांग भवन उभारण्याकरिता निवेदन देण्यात आले. श्रीवर्धनमधील गाव, खेड्यापाड्यातील दिव्यांग तालुक्याठिकाणी शासकीय कामानिमित्त येत असतात. येथील ११०० हून अधिक बांधवांना संपर्कासाठी आणि विविध योजनांची माहिती तसेच संघटनेची विविध उपक्रम आयोजित करण्याकरिता एका दिव्यांग भवनाची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे या छत्राखाली दिव्यांगांच्या व्यवसाय वाढीसाठी उद्योग प्रशिक्षण केंद्र सुद्धा बनवण्याचे संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे अध्यक्ष निलेश नाक्ती यांनी सांगितले. या मागणीनुसार पवार यांनी श्रीवर्धनमधील शासकीय जागेत लवकरच दिव्यांग भवन उभारण्यात येईल, असा शब्द दिला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे. प्रांताधिकारी दीपा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निलेश नाक्ती, उपाध्यक्ष भरत पवार, कार्याध्यक्ष नवाब कुदरते, सल्लागार संतोष पारधी, प्रियंका कासार, नथुराम कांबळेसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
