घनःश्याम कडू
उरण : तालुक्यातील प्रसिद्ध बाईक रायडर तथा खोपटा गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात नेहमीच हिरीरीने भाग घेणारा धर्मेंद्र पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे. सुमारे चौदा दिवसांपूर्वी बाईक राईडच्या माध्यमाने नेपाळ टूर वर गेलेले धर्मेंद्र हे परतीच्या प्रवासात असताना अमरावती-अकोला मार्गावरील डिव्हायडरमधून अचानक समोर आलेल्या दुसर्या बाइकला धडक लागून झालेल्या अपघातात त्यांना छातीला मुका मार लागला होता.
अपघात स्थळावरून एका टमटम रिक्षाद्वारे सुमारे 25 किलोमीटर दूरवर असलेल्या रूग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतांना अखेर त्यांनी प्राण सोडल्याची घटना घडली आहे.
खोपटे गावासह आजूबाजूच्या दहागावात आणि संपूर्ण उरण तालुक्यात दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. रात्री सुमारे साडेबारा वाजता धर्मेंद्र यांचा मृतदेह खोपटे येथे पोहोचल्यावर देखील त्यांच्या अंत्ययात्रेत सुमारे दिड हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. अत्यंत जड अंतःकरणाने खोपटे बांधापाडा-देऊळ पाडा स्मशानभूमीत रात्री दीड वाजण्याच्या सुमारास धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यात आला. धर्मेंद्र पाटील यांच्या मागे आई वडील पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी, काका, काकी असा खूप मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पाटील कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र पाटील यांच्या दहाव्याचा कार्यक्रम खोपटे समुद्रकिनारी असलेल्या नाना नानी पार्क या ठिकाणी मंगळवारी 12 डिसेंबर 2023 रोजी तर उत्तरकार्य विधी गुरुवारी 14 डिसेंबर 2023 रोजी खोपटे बांधापाडा येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती कुटूंबीयांकडून देण्यात आली आहे. सांत्वनासाठी येणार्या कोणीही कोणत्याही प्रकारचे दुखवटे आणू नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत असे आवाहन पाटील कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
