अटीतटीच्या लढतीत करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाचा विजय
रायगड
क्रीडा प्रतिनिधी : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीतील अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात करण क्रिकेट अकॅडमी कामोठे संघांनी अलिबागच्या संघांवर विजय मिळवला आहे. सामन्याच्या सुरवातीला रायगड प्रीमियर लिग कमिटीचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली. त्यावेळी त्यांनी झुंझार युवक मंडळ पोयनाड कमिटीचे कौतुक करत रायगड जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी दरवर्षी १२, १४, १६ वर्षाखालील मुला-मुलींसाठी लेदरबॉल क्रिकेटच्या ४० षटकांच्या एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन, व्यासपीठ आणि प्रसिद्धी देत असल्याबद्दल आभार मानले. अश्या स्पर्धांमधूनच भविष्यात रायगड जिल्ह्याला गुणवान युवा खेळाडू मिळतील जे पुढे महाराष्ट्रासाठी खेळतील असे सांगितले.
अलिबाग संघांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. ४० षटकात १९८ धावांची नोंद धावफलकावर केली. मधल्या फळीत तनिष्का वार्गे हिने दमदार फलंदाजी करत ८८ चेंडूंचा सामना करून १४ चौकरांच्या सहाय्याने ७५ धावा ठोकल्या. मुलांच्या संघात एका मुलीने दमदार फलंदाजी केल्याने प्रेक्षकांनी तनिष्का वार्गेचे कौतुक केले. तिला दुसऱ्या बाजूने सय्यद अहमद (३८), अर्णव शिंदे (१६) यांनी सुरेख साथ दिली. करण क्रिकेट अकॅडमीकडून पियुष दांडेकर यांनी ४ व वेदांत शिंदे यांनी ३ फलंदाजांना बाद केले.
प्रतिउत्तर देतांना करण क्रिकेट अकॅडमी संघांनी कडवी झुंज देत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. अगदी शेवच्या चेंडूवर एक धाव काढत सामना जिंकला. पियुष दांडेकर यांनी ४८, आर्यन पांडे २८, वेदांत शिंदे २१, लिला संघवी यांनी १७ धावांचे योगदान दिले. अलिबाग संघाकडून ईशान काठे व ओम कवळे यांनी प्रत्येकी ३ फलंदाज बाद केले.
अष्टपैलू खेळी करणाऱ्या पियुष दांडेकर याला सामनावीर, दमदार फलंदाजी करणाऱ्या तनिष्का वार्गे हिला स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, सय्यद अहमद इमर्जिंग खेळाडू, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अर्णव पाटील, रिषभ बिश्वास यांना रायगड जिल्हा परिषदेचे उपशिक्षण विभागाचे अधिकारी सुनिल भोपाळे,अलिबाग इंडस्ट्रियल हायस्कूलचे प्राध्यापक नितीन वार्गे, महाराष्ट्र महसूल रायगड विभागाचे कर्मचारी नागेश भगत, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे समन्वयक संदिप वार्गे, झुंझारचे सचिव किशोर तावडे, अजय टेमकर, पंच अभिजित वाडकर, ॲड. पंकज पंडित, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
