शशिकांत मोरे
धाटाव : रोह्यात भारतीय दूरसंचार विभागात कार्यरत असलेले विवेक डोळे यांचा सुपुत्र प्रथम डोळे याने राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग कामगिरी करीत स्कॉड्रन कॅप्टन पदावर यश मिळविले आहे. त्याच्या अपार मेहनतीने मिळविलेल्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. तर असंख्य चाहत्यांनी त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रोह्यात जे. एम. राठी इंग्लिश स्कूल शाळेत शिकून प्रथमने शालेय जीवनात कराटे, पोहणे यासारख्या खेळांमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तसेच दहावीच्या बोर्डामध्ये ९२ टक्के गुण मिळविले होते. सुट्टीमध्ये मामाकडे आजोळी गेल्यावर आजोबांचा गणवेशातील फोटो बघून भविष्यात सैन्यात जाण्याचे ध्येय त्याने निश्चित केल्यामुळे त्याने दहावीनंतर अकरावी, बारावीसाठी सर्व्हिस प्रिपरेटरी अकॅडमी, औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. दरवर्षी राष्ट्रीय रक्षा अकॅडमी (एनडीए)च्या प्रवेश परीक्षेसाठी भारतातून अंदाजे दोन लाख विद्यार्थी बसतात. त्यातच महाराष्ट्रातून फक्त ६० विद्यार्थ्यांची निवड होते. अशा अत्यंत अवघड परीक्षेत प्रथम डोळे यांनी पहिल्याच प्रयत्नात लेखी व तोंडी परीक्षेत यश मिळवले. परंतु दुर्दैवाने शारीरिक क्षमता परीक्षेत त्याला अपयश मिळाले. परंतु भारतीय सैन्यात जाण्याचा त्याचा दृढ संकल्प असल्यामुळे त्याने प्रथम वर्ष इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊन देखील परत एनडीएची परीक्षा दिली आणि शारीरिक क्षमतेमध्ये देखील अथक प्रयत्नाने सुधारणा करून परत एनडीएच्या प्रवेश परीक्षेत त्याने यश मिळवले.
एनडीए येथील खडतर प्रशिक्षणामध्ये देखील त्याने अभ्यासासोबतच वॉटरपोलो, बोट पुलिंग, पोहणे यासारख्या खेळात देखील सुवर्ण पदके पटकावली. त्याने राष्ट्रीय रक्षा अकॅडमी (एनडीए), खडकवासला, पुणे येथील अतिशय खडतर असे तीन वर्षाचे प्रशिक्षण नोव्हेंबर अखेरीस पूर्ण करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पासिंग आऊट परेड यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. यानंतर प्रथम डोळे याचे डेहराडून येथे एक वर्ष पुढील प्रशिक्षण झाल्यानंतर तो भारतीय सैन्यात लेफ्टनंट या पदावर रुजू होणार आहे. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे प्रथम हा पालकांना अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी आहे.
