औद्योगिक सुरक्षा नियम व परवानग्या धाब्यावर?
उद्योग मंत्रालयाचे प्रताप?
मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीत नव्याने उभ्या राहत असलेल्या आदित्य बिर्ला कंपनी करता बॉयलरच्या टाक्या बनवण्याचे काम ज्या स्पार्क कॉर्न इंडस्ट्री लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे त्या कंपनीने ईशाने कांबळे ग्रामपंचायत हद्दीत कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तसेच पर्यावरण व औद्योगिक विभागाचे नियम डावलून बेकायदेशीररित्या टाक्या बनवण्याचा उद्योग चालू केल्याचे उघड झाले आहे.

महाड भोर पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने उभ्या राहत असलेल्या आदित्य बिर्ला कंपनीच्या बॉयलरच्या टाक्या बनवण्याचे काम पुण्यातील स्पार्क कॉर्न इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने ईशाने कांबळे ग्रामपंचायत हद्दीमधील अकबर ताज नावाच्या व्यक्तीच्या चार एकरवरील खुल्या जागेमध्ये या लोखंडी महाकाय टाक्या बनवण्याचा उद्योग मागील चार महिन्यापासून चालविला आहे. मात्र, त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही.

औद्योगिक नियम व पर्यावरण नियमाचा भंग?
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने उभ्या राहत असलेल्या आदित्य बिर्ला कंपनीच्या केमिकल उत्पादन साठवणूक करण्यासाठी अंदाजे 30 महाकाय लोखंडी टाक्या बनविण्याचे काम पुण्यातील स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेडने चालू करून चार महिन्याहून अधिक कालावधी झाला. मात्र, औद्योगिक सुरक्षा नियम धाब्यावर बसवून तसेच पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता व जिल्हा उद्योग केंद्राची देखील कोणतीही परवानगी न घेता या खुल्या जागेत लोखंडी टाक्या बनवण्याचा उद्योग चालू केला आहे. त्यासाठी किमान 50 कामगार अहोरात्र काम करीत आहेत. हे काम चालू असताना ईशाने कांबळे या ग्रामपंचायतीची कोणतीही कायदेशीर परवानगी सदरच्या कंपनीने घेतलेली नाही. केवळ या जागेवर विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र एवढेच मात्र संबंधित ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे.
महाड भोर पंढरपूर रस्त्यावरील ईशाने कांबळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीमार्फत लोखंडी टाक्या बनवण्यासाठी औद्योगिक सुरक्षा नियम धाब्यावर बसवून या ठिकाणचे 50 कामगार अहोरात्र वेल्डिंग मारून टाक्यांच्या जोडणीचे काम करीत आहेत. मात्र, या कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे अथवा या कामगारांचा कोणत्याही प्रकारचा विमा कंपनीने उतरविला नसल्याचे समजते. नुकतीच ३ नोव्हेंबर रोजी महाड औद्योगिक वसाहतीमध्ये ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमध्ये दुर्घटना घडून 11 कामगारांचा मृत्यू तर पाच कामगार गंभीररित्या जखमी झाले असताना या दुर्घटनेची पुन्हा पुनरावृत्ती घडू नये यासाठी संबंधित कंपनीने कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. एकंदरीत काय तर कामगार सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे व औद्योगिक सुरक्षा नियम धाब्यावर बसवून स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने आदित्य बिर्ला कंपनीसाठी अहोरात्र कामगारांना राबवीत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे
याबाबत स्पार्क कॉन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी देखील कोणत्याही प्रकारची आमच्याकडे परवानगी नसल्याचे सांगितले. मात्र एखाद्या स्थानिक नागरिकाने औद्योगिक वसाहतीमध्ये मोकळ्या जागेवर गाड्या दुरुस्त करणे, गाड्या धुणे अथवा वडापाव सेंटर किंवा जेवणासाठी खानावळ चालू केल्यास त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे कर्मचारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे कर्मचारी, स्थानिक पोलीस हे तातडीने दखल घेतात मात्र आदित्य बिर्ला कंपनीसाठी अवैधपणे वेल्डिंगचे काम करून लोखंडी टाक्या बनवण्याचे काम करणाऱ्या स्पार्क कॉन इंडस्ट्रीजने सर्व नियम धाब्यावर बसवून शासकीय नियमांना हरताळ फासल्याचे दिसत असताना देखील जिल्हा उद्योग केंद्र, महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचे अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांनी डोळ्यावर काळीपट्टी बांधून या कंपनीला बेकायदेशीर काम चालू ठेवण्याचा परवाना दिलाय का? असा सवाल स्थानिक ग्रामस्थ राज्य शासनाला विचारीत आहेत.
प्रादेशिक परिवहन अधिकारी व स्थानिक पोलीस स्टेशन झोपा काढते का?
ईशाने कांबळे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आदित्य बिर्ला कंपनीसाठी महाकाय वेल्डिंगच्या टाक्या बनवण्याचा उद्योग मोकळ्या जागेवर करण्याचे काम स्पार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने चालू केले आहे. त्या लोखंडी महाकाय टाक्या या ठिकाणावरून औद्योगिक वसाहतीमध्ये नव्याने उभ्या राहत असलेल्या आदित्य बिर्ला या कंपनीसाठी वाहतूक करण्याचे काम होणार आहे. मात्र, वाहतूक करीत असताना रस्त्याची लांबी रस्त्याची रुंदी व विद्युत तारांचे अडथळे तसेच अवजड वाहनांद्वारे वाहतूक करीत असताना घ्यावयाची दक्षता याबाबत कंपनीने कोणतीही परवानगी अद्याप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून घेतलेली नाही. तसेच स्थानिक पोलीस स्टेशनला देखील याबाबत त्यांनी सुतराम कल्पना दिलेली नाही. महाड औद्योगिक वसाहतीतील औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना, अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना व व औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयात देखील त्यांनी याबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याने अथवा विद्युत महामंडळाचे अडथळे कसे दूर करणार त्यांना देखील कल्पना दिली नसल्याने याबाबत सर्वच खाते अंधारात असताना कारवाई कोणी करायची व त्यावर नियंत्रण कोण ठेवणार असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र या अनधिकृत कंपनीला बेकायदेशीररित्या लोखंडी टाक्या बनवण्याचा उद्योग चालू असताना त्यांना राजकीय वरदहस्त नेमका कोणाचा आहे? तसेच यातून कोणाचे भले होणार आहे? असे उलट सुलट प्रश्न इसाने कांबळे गावातील ग्रामस्थांसहित विद्युत महामंडळाचे अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी व औद्योगिक महामंडळाचे अधिकारी हे सर्वजण आपापसात चर्चा करताना विचारताना दिसत आहेत.
