सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील निजामपूर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून घरातील ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून तो फरार झाला आहे. सदरील घटना शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता ते रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान फिर्याद यांच्या राहते घरी घडली. याबाबतची फिर्याद मारुती नामदेव काकरे (वय-५५) मूळ रा. माळहिपरगा जि. लातूर सध्या रा. सोमजाई अपार्टमेंट निजामपूर ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी मारुती नामदेव काकरे यांच्या बंद घराच्या दरवाजाचा टाळा कोणत्यातरी साधनाने तोडून दरवाजा उघडून त्यावाटे आत घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील शोकेसच्या वरच्या कप्प्यात ठेवलेल्या पर्समधून एक सोन्याची चैन वजन १० ग्रॅम जुनी वापरती अंदाजित किंमत ६० हजार रुपये,एक सोन्याची नथ वजन ०१ ग्रॅम जुनी वापरती अंदाजित किंमत ५ हजार रुपये असे एकूण ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरटा फरार झाला आहे. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्या इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ३५८/२०२३ भादवि संहिता कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुणतुणे हे करीत आहेत.