• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे पाठीशी राहील -विष्णुभाई पाटील

ByEditor

Dec 12, 2023

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच

विनायक पाटील
पेण :
“हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे तुमच्या पाठीशी राहील. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. या उक्तीनुसार 52 गावातील जनतेने एकजुटीने राहून लढा तीव्र करावा लागेल. वरील गावातील लोकांची पारिस्थिती अत्यंत बिकट आहे. लोकांना पाघोलीचे पाणी साठवावं लागतं. तळ्यामध्ये कपडे धुवावे लागतात. अंघोळीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या परिस्थितीवर मात करायचे असेल तर संघटीत होऊन शासन, प्रशासन यांना जागे करावे लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना एकत्रित बोलावून निर्णय घेणे गरजेचे आहे. तसेच थंडी आणि दिवसा उष्णता त्या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याचा प्रकृतीवर थोडा त्रास होतोच अशी परिस्थिती असताना या ठिकाणी डॉक्टर 24 तास उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. उपोषण करणारे या ठिकाणी पाण्याचा पण त्याग करणार आहेत. पाण्याचा त्याग केल्यानंतर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून शासनाने याकडे लक्ष देऊन उपोषणकर्तांच्या मागण्या सोडविण्याची जबाबदारी घ्यावी.” असे विष्णुभाई पाटील यांनी वाशी येथे उपोषणस्थळी भेट दिली त्यावेळी मनोगत व्यक्त करताना केले. यावेळी त्यांनी जीवन पाटील यांचे कौतुक केले. जीवन पाटील यांनी आमदार सुनील शिंदे यांना फोन करून वाशी येथील आमरण उपोषण सुरू असल्याचे सांगून अधिवेशनात सदर मुद्दा उपस्थित करण्याची विनंती केले होती. त्यानुसार शिंदे यांनी हा प्रश्न अधिवेशनात मांडला होता.

विष्णूभाई पाटील शिवसेना उबाठा गट रायगड जिल्हा संपर्क प्रमुख यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला. यावेळी त्यांच्यासह शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, जीवन पाटील, तुकाराम म्हात्रे, काँग्रेस पेण शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, अनंत पाटील, नितीन पाटील, समीर म्हात्रे, प्रसाद देशमुख, पंढरीनाथ पाटील, वाशी सरपंच संदेश ठाकूर, वि के म्हात्रे, कांचन म्हात्रे व इतर उपस्थित होते.

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेतर्फे वाशी येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सौ. नंदा म्हात्रे, हेमंत पाटील, जितेंद्र ठाकूर, अभि म्हात्रे, दिलीप म्हात्रे, स्वप्निल म्हात्रे, चंद्रहास म्हात्रे, अजित पाटील हे उपोषणास बसले आहेत. यावेळी राजन झेमसे, प्रकाश माळी, राजेंद्र म्हात्रे व इतर अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणाल पाठिबा दर्शविला. पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत हेटवणे कालव्याचे पुढील कामाचे चतुर्थ सु.प्र.मा.प्रस्तावास मंजूरी मिळावी व खारेपाटातील पिण्याच्या पाण्याशी संबधित इतर सर्व मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी वाशी येथील जगदंबा देवीचे प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

१. जलसंपदा विभाग हेटवणे मध्यम प्रकल्पाचे जा.क्र. कोंपाविम/तां.४/हेटवणे सु.प्र.मा/३३०७/सन २०२३ दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजीच्या जलसंपदा विभागाचे मुख्यसचिवांना सादर केलेल्या सुधारीत चतुर्थः सु.प्र.मा.प्रस्तावास जलसंपदा मंत्रालयाच्या कॅबिनेट मिटींगची मंजूरी मिळून योजनेचे पुढील टप्यातील कामाचे निविदेचे आदेश होवून कालव्याचे काम सुरु करावे.
२. हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन खारेपाटातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळावे.
३. जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था पाणी पुरवठा योजनेचे काम दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करावे.
४. खारेपाटातील शेतकऱ्यांना हक्काचे सिंचनाचे पाणी वितरीत करावे. या मागण्यासाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!