मिलिंद माने
महाड : दिवसेंदिवस हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे. अशा हॉटेलमधून वापरल्या जाणाऱ्या खाद्य तेलाची तपासणी अन्न औषध प्रशासनाच्या फूड ऑन व्हील या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात आली.

राज्याच्या अन्न औषध प्रशासनाच्या बांद्रा-मुंबई कार्यालयाची फूड ऑन व्हील ही मोबाईल व्हॅन रायगड जिल्ह्यात दाखल झाली होती. या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांची तपासणी करण्यात आली. महाड शहरातील काही हॉटेलमध्ये औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या डिजिटल तपासणी ‘फ्राय ऑईल मॉनिटर’ या उपकरणाद्वारे हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची ‘टोटल पोलर काउंट टेस्ट’ घेण्यात आली. हॉटेल, खाद्यपदार्थ स्टॉल यामधून खाद्यपदार्थ तळण्यासाठी पुन्हा पुन्हा तेच तेल वापरले जाते यामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
राज्य शासनाच्या अन्न औषध प्रशासनाने ही बाब गंभीरपणे घेतले असून अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत जनजागृती बरोबरच हॉटेलमधील अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या फ्राय तेलाची तपासणी केली जात आहे. याकरिता मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील आलेली ‘फूड ऑन व्हील’ ही व्हॅन पेणपासून महाडपर्यंत आली होती. ‘फूड ऑन व्हील’ या मोबाईल व्हॅन बरोबर आलेल्या अन्न औषध प्रशासनाचे हेमंत शेलार यांनी हॉटेलमध्ये वापर केलेल्या तेलाचे नमुने घेऊन तपासणी केली. खाद्यतेलाच्या टोटल पोलर काउंट मात्रा 25च्या वर आल्यास हे तेल शरीरास घातक ठरते. यातून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असल्याने तेलाचा वापर शक्यतो टाळायला पाहिजे असे देखील हेमंत शेलार यांनी सांगितले.
महाडमध्ये बहुतांश हॉटेलमध्ये वापरले जाणाऱ्या तेलाची टोटल पोलर काउंट मात्रा 25 पेक्षा कमी आढळल्याचे देखील त्यांनी नमूद केले. असे असले तरी या तेलांचा वापर करताना हॉटेल मालकाने काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी हॉटेल व्यवसायिकांना केले. खाद्यपदार्थ विक्रेत्यांमधून मिठाई उत्पादक, चायनीज स्टॉल, किरकोळ अन्नपदार्थ उत्पादक यांच्याकडून पुन्हा पुन्हा तेच तेल वापरण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. याबाबत देखील विशेष तपासणी मोहीम आखून कारवाई केली जावी अशी मागणी महाड पत्रकार संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे.