• रेवदंडा पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूंडलिका खाडीत डिझेल तस्करी
• आठ दिवसात नवी मुंबई पोलिसाची रायगड जिल्ह्यात दुसरी कारवाई
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या उत्सव गार्डन हॉटेल समोर, गोवा-पनवेल रोडवर नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध डिझेल तस्करी करीत असताना राजमनी पुरषोत्तम सरोज (वय ३९, धंदा – चालक, रा. रूम नं. ९३, गजानन चाळ, एम. एच. रोड, सायन, मुंबई. ३७, मुळ रा. ग्राम – दुधली, पो. गुलजारगंज, ठाणा सिकरारा, ता. जि. जोनपुर, उत्तरप्रदेश) याला करोडोंच्या मालासहित ताब्यात घेतले असून रामनारायण सुबेदार सिंग (रा. प्लॉट नं. ४२२, शशि व्हिला, से.क. ०१, दर्गाजवळ, घणसोली, नवी मुंबई), हृदयसिंग सुबेदार सिंग (प्लॉट नं. ४२२, शशि व्हिला, से.क. ०१, दर्गाजवळ, घणसोली, नवी मुंबई) हे दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध नवी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. याबाबतची फिर्याद नितीन नामदेव जगताप,(पोलिस हवालदार बक्कल नंबर ४४७, नेमणुक – मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोवा-पनवेल रोडने १२ टायर टँकर क्र. एमएच 43 सीई 1655 यामधुन अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ येणार आहे असल्याचे गोपनिय बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे ( नेम- मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांचे आदेशाने उत्सव हॉटेल समोर, गोवा-पनवेल रोडवर, ता. पनवेल जि. रायगड या ठिकाणी जावुन सापळा लावला असता १२ टायर टँकर क्र. एमएच 43 सीई 1655 हा येताना दिसताच त्यास थांबवुन पोउनि संजय रेड्डी यांनी सदर टँकर चालकाला पोलीस पथकाची ओळख करून देवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव राजमनी पुरषोत्तम सरोज यांच्याकडे वाहन व त्यामध्ये असणाऱ्या मालाबाबत विचारपुस केली असता, त्याने सदरचा टँकर हा रामनारायण सुबेदार सिंग यांचे मालकीचा असुन त्यांचा भाऊ हृदयसिंग सुबेदार सिंग यांचे सांगण्यावरून सदर टँकरमध्ये अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथुन समुद्रातील बोटीतुन सुमारे २८,००० लिटर डिझेल मोटारचे सहाय्याने त्याचे ताब्यातील टँकरमध्ये भरले असल्याचे सांगुन मालक हृदयसिंग सुबेदार सिंग यांचे सांगण्यावरून सदरचा टँकर तो घेवुन येत होता असे सांगितले. सदर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचे मालाबाबत त्यांचेकडे कागदपत्र मागितले असता, त्यांचेकडे कोणतेही वैध कागदपत्र तसेच ऑईल कंपनीचे अधिकृत इन्व्हॉईस किंवा आयात केल्याचे बील, इंट्री अथवा कस्टम क्लिअरन्स किंवा इतर कुठलेही वैध इन्व्हॉईस तसेच नमुद टँकरचे व त्यातील मालाचे त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून सदर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ संशयास्पदरित्या व गैर उद्देशाने वाहतुक करीत असल्याचा संशय आल्याने सदर टँकरमधील डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थ हा त्यांचेकडे वरीलप्रमाणे मिळालेल्या गोपनिय माहितीच्या अनुषंगाने असण्याची शक्यता वाटल्याने सदर टँकर क्र. एमएच 43 सीई 1655 मध्ये पोलिस हवालदार नितीन जगताप व टँकर चालक यांना बसवुन टँकर नमुद चालकाच्या मदतीने चौकशीसाठी मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे आणण्यात आला. सदरचा टैंकर हा पाच कप्याचा असुन प्रत्येक कप्यास आतुन होल पाडलेले असुन तो आतुन सलग एकच असल्याचे चालक हा समक्ष सांगत आहेत. त्यामध्ये कप्पा क्र. १ ते ४ अ.क. ६००० लिटर क्षमतेचे असुन कप्पा क्र. ५ हा ५००० लिटर क्षमतेचा आढळुन आला. सदर कप्प्यामधील साठयाची अधिकाऱ्यांनी लोखंडी डिपॉडचे सहाय्याने मोजदाद केली असता त्यामध्ये सर्व एकत्रित पाच कप्यामध्ये २६,३२,०००/- रू. किंमतीचे एकुण २८,००० लिटर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा आढळुन आला आहे. या प्रकरणी राजमनी पुरषौत्तम सरोज यास अटक केली असून रामनारायण सुबेदार सिंग आणि त्यांचा भाउ हृदयसिंग सुबेदार सिंग हे दोघेजण फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई ६७९/२०२३, भादवि कलम २८५,३४ तसेच जिवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३.७,८ व १० व मोटार स्पिरीट अॅण्ड हायस्पिड डिझेल (रेग्युलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशर अँड प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टीसेस) ऑर्डर २००५ चे कलम २ (ए) (पी) (क्यु) (आर) (एस) (टी), ३(४), ३ (५) तसेच पेट्रोलीयम ऍक्ट १९३४ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक संजय रेड्डी, मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा हे करीत आहेत.
नोव्हेंबर 2023 मध्ये अलिबाग तालुक्यातील रेवदंडा खाडी येथे डिझेल तस्कर यांनी नवीन ठिकाण केले असून याला जिल्हा प्रशासनाचा वरदहस्त आहे अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी जिल्हा पोलिस यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र नवी मुंबई पोलिसांनी पनवेल गोवा रोडवर डिझेल सदृश्य पेट्रोलियम द्रव पदार्थाच्या साठ्याची वाहतूक करीत असणारा टँकर पकडुन चौकशी केली असता सदर टँकर हा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे भरला असल्याचे सिद्ध झाले आहे. रायगड पोलिस एकीकडे अब्जावधी रुपयांचा अमली पदार्थ जप्त करीत असतानाच नवी मुंबई पोलीस रायगड जिल्ह्यात येवून कारवाई करतात याचा अर्थ काय? |