सीसीटिव्हीची मदत आली कामी, नेरळ पोलिसांची आणखी एक धडाकेबाज कामगिरी
गणेश पवार
कर्जत : नेरळ परिसरात दोन मोबाईल चोरीच्या घटना घडून त्यात ५ मोबाईल चोरीला गेले होते. याबाबत फिर्यादी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर नेरळ पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यासाठी कंबर कसली. तर या प्रकरणात सीसीटिव्ही पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा बनल्याने अखेर आरोपीला नेरळ पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान आणखी एका धडाकेबाज कारवाईने नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११ ते १२ डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री नेरळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेले साईश्रद्धा हॉटेल येथे वेटर असलेले मुकेशकुमार रावत हे हॉटेलमध्ये झोपलेले होते. तर हॉटेलचे शटर थोडेसे उघडे असताना आरोपी याने त्या उघड्या शटरमधून आत प्रवेश करत सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ४ मोबाईल लंपास केले. तर येथून थोड्या अंतरावर असलेल्या सेवालाल नगर येथे अनिल किसन चव्हाण हे घरात झोपलेले असताना त्यांच्या घराची बंद खिडकी उघडून चोरट्यांनी त्यामधून प्रवेश करत त्यांचा रिअल मी कंपनीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला. या दोन्ही प्रकरणाचा गुन्हा नोंद झाल्यावर नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली. त्यानुसार एक तपास पथक बनवून या गुन्हाचा उलगडा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगळ, सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे, पोलिस हवालदार नवनाथ म्हात्रे यांचा समावेश होता. या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. यासाठी तांत्रिक मदत घेत सीसीटिव्ही तपासण्यात आले. आणि पोलिसांसाठी हा गुन्हा उघड करायला सीसीटिव्ही सगळ्यात मोठा दुवा ठरला. यात दिसून आलेला तरुण याची पोलिसांनी गुप्त बातमीदार यांच्याकडून चौकशी केली असता तो तरुण बदलापूर येथील असल्याचे समजले त्यानुसार आकाश सुनिल पारधी वय १९ वर्ष, राहणार सम्राट अशोक नगर पाण्याच्या टाकीजवल बदलापूर पूर्व याला पोलिसांनी ताब्यात घेतला. त्याच्याजवळ पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याला न्यालयासमोर पोलिसांनी हजर केले असता त्याला पोलिस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान नेरळ पोलिसांनी आणखी एक गुन्हा उघड करत चोरट्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. तर या कारवाई बद्दल नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.