• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर कर्मचारी चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त

ByEditor

Dec 19, 2023

शामकांत नेरपगार
नागोठणे :
येथील ग्रामपंचायतीचे कुशल प्लंबर नागोठणे ग्रामपंचायत हद्दीतील मुरावाडी गावाचे सुपुत्र चंद्रकांत ताडकर हे आपल्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 1 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. ग्रामपंचायत हद्दीतील जलवहिनीचा प्रमुख माहितगार निवृत्त झाल्यामुळे नागोठणेकर नागरिकांमध्ये काळजी व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसरात्र नागोठणेकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेले चंद्रकांत ताडकर यांच्या हॉटेल कामत येथे रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती समारंभा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी ताडकर यांचे भरभरून कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी रजिप माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन, नागोठणे सरपंच सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, पाहिले लोकनियुक्त सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, माजी उपसरपंच मोहन नागोठणेकर, सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, प्रकाश कांबळे आदी मान्यवरांसह ताडकर यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार व मुरावाडी ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते. तदनंतर सोमवार, दि.18 डिसेंबर रोजी चंद्रकांत ताडकर यांच्या मुरावाडी येथील निवासस्थानी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव दिलीपभाई टके, उत्सव कमिटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब टके, जे. एम. म्हात्रे कन्स्ट्रक्शनचे अभियंता प्रसाद गवळी यांनी भेट देऊन ताडकर यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाची काळजी घेणारे चंद्रकांत ताडकर यांना त्यांच्या मुलांनी टाटा स्पंज ही चारचाकी गाडी सेवानिवृत्ती निमित्त भेट दिली.

चंद्रकांत ताडकर हे नागोठणे ग्रामपंचायत प्लंबर कर्मचारी म्हणून 1989 साली कामावर रुजू झाले. त्यांनी महापूर परिस्थिति सारख्या संकट काळात मोठ्या जिद्दीने व चिकाटीने काम केले आहे. त्यांनी 34 वर्षे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून नागोठणे गावाची प्रामाणिकपणे सेवा केली. आपल्या सेवेत ताडकर यांना अनेक संकटांना समोरे जावे लागले आहे. त्यांनी घरातील गरिबीच्या परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांची दोन मुले नामांकित कंपनीत काम करीत असून एक मुलगा पोलिस खात्यात सेवा करीत आहे. चंद्रकांत ताडकर सेवानिवृत्त झाले असले तरी नागोठणे ग्रामपंचायतीला त्यांची वेळीवेळी गरज भासणार आहे. नागोठणे ग्रामपंचायतीला जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल तेव्हा तेव्हा मी मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन असे चंद्रकांत ताडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!