• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बेपत्ता महाविद्यालयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

ByEditor

Dec 21, 2023

मिलिंद माने
महाड :
दोन दिवसापूर्वी बेपत्ता झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा शोध अखेर लागला असून या विद्यार्थिनीने केंबुर्ली गावाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. ही आत्महत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याची चर्चा देखील स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

महाड तालुक्यातील हिरकणी वाडी येथील कोएसो विद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारी प्रिया तुकाराम गोरे (वय १७) ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून महाडला आली होती. मात्र, संध्याकाळी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी प्रिया ही बेपत्ता झाल्याची तक्रार महाड शहर पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार गेली दोन दिवस तिचा शोध सुरू होता. महामार्गालगत केंबुर्लीनजीक एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती चालत जात असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर पुढे ती आढळून आली नाही. तिच्या घरच्यांनी गुरुवारी सकाळी केंबुर्ली परिसरात पुन्हा शोध सुरू केला असता केंबुर्ली गावाच्या परिसरात नदीकिनारी असलेल्या झाडीमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे तिच्या वडिलांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली असता, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचे शव महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवून दिले. सदर मुलीने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतेच कारण पुढे आले नसून पोलीस तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!