• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप : अलिबाग न्यायालयाचा निकाल

ByEditor

Dec 20, 2023

पेण तालुक्यातील मौजे पांचोळा आदिवासीवाडी येथे घडला होता गुन्हा

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील मळेघर आदिवासी वाडीवरील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी यास विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी दि. २०/१२/२०२३ रोजी महत्वपुर्ण निकाल देत जन्मठेपेची शिक्षा सुनावत सहा हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

पेण तालुक्यातील मौजे पांचोळा आदिवासीवाडी वडगाव, प्रायव्हेट हायस्कुलचे बाजुला गावचे हद्दीत दि. २९/१२/२०२० ते ३०/१२/२०२० रोजीचे दरम्यान सदर गुन्हा घडला आहे. यातील पुर्वदोषसिध्दी झालेला आरोपी आदेश मधुकर पाटील याने फिर्यादी व त्यांची ३ वर्षे वयाची पणती (पिडीत मुलगी) हे आदिवासी कातकारी या मागासवर्गीय प्रवर्गातील असल्याचे माहित असतानाही त्याने फिर्यादीची ३ वर्षे वयाची पिडीत पणती (नातवाची मुलगी) ही तिच्या वडीलांसोबत घरात झोपलेली असताना तिच्यावर बलात्कार करण्याच्या तयारीनिशी व उद्देशाने घरात अनधिकृत प्रवेश करुन तीला तिच्या वडीलांच्या कायदेशीर रखवालीतुन घरातुन घेवून जावून ती ३ वर्ष वयाची व संमती देण्यास असमर्थ असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिकरित्या बलात्कार करुन तीला जिवे ठार मारले हे न्यायालयासमोर सिध्द झाले आहे.

या प्रकरणातील फिर्यादी यांनी पेण पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असता, ह्या प्रकरणी सदर केसचा पेण उप विभागीय अधिकारी व्ही. व्ही. चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जलदगतीने तपास पूर्ण करुन मोलाचे सहकार्य केले. सदर खटल्यात महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त विशेष शासकीय अभियोक्ता उज्वल निकम यांनी एकूण २६ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. यामध्ये अति. सरकारी वकील भुषण साळवी यांनी सहाय्यक म्हणुन काम पाहिले. त्यामध्ये फिर्यादी, या प्रकरणातील साक्षीदार, तपासिक अंमलदार यांची साक्ष कोर्टासमोर महत्वपूर्ण ठरली.

विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी दिनांक २०/१२/२०२३ रोजी महत्वपुर्ण निकाल दिला. सदर खटल्यात विशेष शासकीय अभियोक्ता, महाराष्ट्र शासन उज्वल निकम यांनी सरकारपक्षातर्फे मा. कोर्टासमोर प्रभावी युक्तिवाद केला. युक्तिवादामध्ये सरकारपक्षाने आरोपींच्या गुन्ह्यांचा पुर्वइतिहास कोर्टासमोर सादर केला. तसेच आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील आरोपीच्या वर्तवणुकीत कोणतीही सुधारणा नाही. त्यामुळे आरोपीस मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी असे प्रतिपादन केले. सदर खटल्यातील आरोपी आदेश मधुकर पाटील उर्फ याडी याच्यावर भा. द वि. ३७६ (आय) (जे), ३७६ (अ), ३७६ (अ) (ब), ३७७, ३०२, ३६३, ३६६ (अ), २०१, ४५०, ४५५, ७५ सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सन २०१२ चे कलम ४, ५ (जे) (चार), ५ (एम), ६, ८, १२ सह अ.जा.ज.अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (डब्ल्यु) (१) (२), ३ (२) (व्हि) या कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. त्यातील भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे तसेच भा.द.वि. कलम ३७६ (अ), ३७६ (अ) (ब), सह पोक्सो कायदा कलम ५ (एम) सह ६ प्रमाणे मा. न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तीला जीवे ठार मारल्याप्रकरणी आरोपीस दोषी पकडून जन्मठेपेची शिक्षा व रक्कम रुपये ५,०००/- द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच भा.द.वि. कलम ३६३ व ४५५ प्रमाणे दोन वर्षांची शिक्षा व रक्कम रुपये १,०००/- द्रव्यदंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!