मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या घटनेत अकरा कामगारांचा जळून मृत्यू तर पाच कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी महाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल नेमका कधी येणार? व त्या अहवालात कोणावर दोषारोप पत्र ठेवले जाणार? याकडे लक्ष लागून राहिले असून समितीकडून अहवाल देण्यास जाणीवपूर्वक विलंब होत होत असल्याची चर्चा महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांमध्ये कामगार वर्गाकडून ऐकण्यास मिळत आहे.

महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची चौकशी समिती गठित केली आहे. या समितीमध्ये औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापन जी. एस. हरलया, पनवेल येथील कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ, महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. हजारे, महावितरणचे गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता आर. जे .पाटील, महाड येथील अग्निशमन दलाचे अधिकारी प्रवीण घोलप व महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमधील अकरा कामगारांच्या मृत्यूनंतर मृत कामगार व जखमी कामगारांच्या नातेवाईकांना मदत मिळाली असली तरी हा प्रकार नेमका कशामुळे घडला याबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीमधील काही अधिकारी जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची चर्चा औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्गाकडून ऐकण्यास मिळत आहे. महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीमधील जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरलया., कामगार उपायुक्त बाबासाहेब वाघ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक केशव केंद्रे यांनी याबाबत आपला सुस्पष्ट अहवाल समितीचे अध्यक्ष व महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्याकडे अद्याप दिला नसल्याचे सूत्रांकडून खात्रीलायकरित्या सांगण्यात आले आहे. हे अधिकारी जाणीवपूर्वक अहवाल देण्यास विलंब करीत आहेत का? अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे. यांच्या अहवालावरच सर्वकाही अवलंबून असल्याने यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? तसेच यामागे कोणाला पाठीशी घालायचे आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबाबत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील चर्चा घडून आली मात्र, तरी देखील याबाबत अहवाल देण्यास संबंधित अधिकारी का जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीमधील कंपनीच्या व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे अकरा कामगारांचा मृत्यू झाला व पाच कामगार गंभीरित्या जखमी झाले. या सर्वांना शासकीय मदत मिळाली असली तरी आज देखील अनेक कंपन्यांमधील कामगार सुरक्षा रामभरोसे असून जोपर्यंत ब्लू जेट हेल्थकेअर कंपनीच्या चौकशी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल हा सार्वजनिक होत नाही व त्यामध्ये कोण दोषी आहे व त्यांच्यावर काय कारवाई होणार हे सर्व गुलदस्त्यात असून यामागे नक्की कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? असा सवाल महाड औद्योगिक वसाहतीमधील कामगार वर्गामधून उपस्थित होत आहे.