• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने!

ByEditor

Dec 22, 2023

गोगावले समर्थकांची दडपशाही उध्दव गटाकडून उधळली
तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना अपयश?

मिलिंद माने
महाड :
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारांशी बोलताना बाळासाहेबांच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुला वर जावे लागेल असे भाष्य दोन दिवसांपूर्वी केले होते याबाबत ठिकठिकाणी राज्यात आमदार भरत गोगावले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर महाडमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटात जोरदार राडा झाला.

महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज दुपारी चारच्या सुमारास आमदार भरतशेठ गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. मात्र, तत्पूर्वी शिंदे गटाच्या गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली. गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू असा पवित्रा घेतला. यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यामुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच कार्यकर्त्यांची फळी उभी केली. यामुळे दोन्ही गटांमध्ये हाणामारी देखील झाली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घडल्याने बघणाऱ्या नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दोन्ही गट आमने सामने आले. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण देखील झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र अपयशी ठरले.

महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पोलीस पथक सोबत असताना देखील दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यात विलंब केला. केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने दोन्ही गटाकडून कार्यकर्ते जमा होऊन आक्रमक होत गेले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून निषेध व्यक्त केला जाणार होता ही माहिती असताना देखील पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना जमा कसे होऊन दिले? असा प्रश्न उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिल्हा राखीव पोलीस दलाबरोबरच महाड औद्योगिक पोलीस ठाणे, महाड शहर, महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात तैनात केले. मात्र, तरी देखील दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार वारंवार पोलिसांसमोरच घडले. महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून चढाओढ निर्माण झाली. यामुळे अखेर पोलिसांनी पुतळा परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलीस कर्मचारी महिलेने हार घातला. माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी स्वामी हे पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावाला पांगवण्यात यश आले.

महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारपासूनच मोठ्या प्रमाणावर शिंदे गटाकडून गर्दी जमा झाली होती. तर उद्धव ठाकरे गटाकडून त्या पक्षाचे कार्यकर्ते माणिकराव जगताप यांच्या कार्यालयात जमा झाले होते. अखेर पाचच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते माणिकराव जगताप यांच्या कार्यालयाजवळून चालत घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला. वास्तविकता पोलिसांनी महाडमध्ये जमावबंदी केली असताना मुळात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी कशी काय जमा झाली व जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी का पांगवले नाही? असा मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ही सर्व परिस्थिती हाताळण्यात महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे सपशेल अपयशी असल्याची चर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या लोकांकडून ऐकण्यास मिळाली.

महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सत्ताधारी शिंदे गट व विरोधी उद्धव ठाकरे गट कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाच्या प्रकरणाचे पडसाद सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाद्वारे ग्रामीण भागात पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पोलिसांनी गावातील हालचालींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याची चर्चा महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऐकण्यास मिळाली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!