कर्जत पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
गणेश पवार
कर्जत : तालुक्यात आज सकाळी खळबळ उडवून देणारी घडली आहे. तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आंब्रे या २८ वर्षीय तरुणीची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे. आज दिनांक २४ रोजी सकाळी गावाच्या बाहेरील पावसाळ्यात वाहणाऱ्या नाल्यात कुणाल उर्फ रॉनी याचा मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. त्यानंतर तत्काळ कर्जत पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची त्यांनी पाहणी केली असता रॉनी याला दगडाने ठेचून, लोखंडी सळईच्या साहाय्याने आघात केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रात्रीच्या सुमारास रॉनी घरी येत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला असेल असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रॉनी याच्यावर यापूर्वी देखील ३ हल्ले झाले होते. याबाबत तक्रार देखील त्याने पोलिस ठाण्यात दिली होती. तेव्हा या हत्येला पूर्ववैमनस्याची किनार आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. तर कर्जत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्यावतीने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.