झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत एसबीसी महाड विजयी
क्रीडा प्रतिनिधी
पोयनाड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल ज्युनियर वयोगटातील क्रिकेट स्पर्धेत एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाड संघाचा तडाखेबाज सलामीवीर आरुष कोल्हेने स्पर्धेतील लागोपाठ दुसरे शतक ठोकत महाड संघाला विजय मिळवून दिला. अवघ्या १२६ चेंडूंचा सामना करत २३ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने आरुषने १५७ धावा काढल्या व स्पर्धेतील लागोपाठ दुसरे शतक ठोकले.

नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाने सुरवातीला सुरेख गोलंदाजी केली. ईशान काठे व ओम भगत यांनी महाड संघाच्या सलामीच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. महाड संघाचे सलामीचे फलंदाज आरुष कोल्हे आणि संमित कोथमिरे यांनी चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूंवर प्रहार केला. सुरवातीला संयमी खेळ करत दोन्ही सलामीवीरांनी डावाला आकार दिला. मात्र, नंतर आरुष कोल्हेने आक्रमक पवित्रा घेत धावांचा पासून पाडला. ४० षटकांच्या समाप्तीनंतर महाड संघांनी ९ गडी गमावत २९९ धावसंख्या उभारली. त्यामध्ये आरुष कोल्हे याने १५७ धावा केल्या तर संमित कोथमिरे याने ४२, रोशनी पारधी हिने १९ धावांचे योगदान दिले. जगदीश क्रिकेट अकॅडमी अलिबाग संघाकडून ईशान काठे याने सुरेख गोलंदाजी करत ४ फलंदाजांना तंबूत पाठवले. ओम भगत व नक्ष भगत यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.
प्रतिउत्तरात अलिबाग संघांने ३८ षटकांमध्ये सर्व गडी गमावत १२९ धावा केल्या. त्यामध्ये यष्टीरक्षक अर्णव शिंदे याने ४५ धावांची खेळी केली. महाड संघाकडून प्रशांत साबळे याने ३, आरुष कोल्हे व अश्वत्थ तेग्वान यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. एसबीसी महाड संघाने सामना जिंकत बाद फेरीसाठी प्रवेश निश्चित केला आहे. शतकवीर अष्टपैलू खेळाडू आरुष कोल्हे याला सामनावीर, ईशान काठे स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, प्रशांत साबळे, अर्णव शिंदे, स्मित पाटील यांना इमर्जिंग प्लेयर तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून शिवा कुशवाह व ओम भगत यांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष जयंत नाईक, एमसीएचे माजी प्रशिक्षक व टायका स्पोर्ट्स वेअरचे सेल्स एक्सिक्युटीव्ह शंकर दळवी, झुंझारचे सदस्य अजय टेमकर, जगदिश ढगे, आवेश चिचकर, अभिजित वाडकर, रमेश पाटील, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.