कोकणातील पर्यटनस्थळाकडील सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
सलीम शेख
माणगाव : शनिवार आणि रविवार त्यातच थर्टीफस्टची फोडणी यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तसेच पुणे-दिघी महामार्गावर पहाटेपासून पर्यटकांचे लोंढे कोकणातील पर्यटन स्थळाकडे ओथंबून वाहू लागले आहेत. यामुळे माणगाव बाजारपेठेसह सर्वच पर्यटन स्थळाकडे जाणारे येणारे मार्ग वाहनांनी तुंबले असून नागरिकांची जीवनवाहिनी कोलमडून पडली आहे. कोकणातील पर्यटन स्थळाकडील सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर पाणीच पडले आहे.
पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रायगड जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय व पर्यटनस्थळे हाउस फुल झाली आहेत. गेले आठ दिवसापासून कोकणात अनेक पर्यटकांचे थवे या निसर्गाचा मुक्तपणें आस्वाद घेण्यासाठी व टेन्शन फ्री कोंडलेल्या मनाला मोकळी वाट काही काळासाठी करून देण्यासाठी रायगडात विविध ठिकाणी दाखल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पुणे दिघी मार्गावरील माणगाव हे ठिकाण महत्वाचे असून या मार्गावर गेली आठ दिवस सतत वाहतुकीची कोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची झोप उडाली असून चांगलीच दमछाक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील महत्वाचे शहर म्हणून माणगावकडे पाहिले जाते. या शहरातून तळ कोकणात जाणारा महामार्ग आहे. मुंबई कडून कोकणात व तळ कोकणात जाणाऱ्या प्रवाशी, पर्यटकांना मुंबई गोवा महामार्ग जवळचा व सोयीस्कररित्या सोपा वाटतो. दुसरा मार्ग पुणे कडून आहे मात्र तो लांब पडत असल्यामुळे अनेक प्रवासी, पर्यटक त्यामार्गे प्रवास सहसा करीत नाहीत.
माणगाव बाजारपेठेतून हा मार्ग जात असल्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक वाढली आहे. पर्यटक मोठया प्रमाणात कोकणात वाढला असला तरी रस्ते मात्र गेली अनेक वर्षाचे जैसे थेच आहेत. त्यातच रस्तेच्या कडेला असणारी टपऱ्या, छोटे उद्योजक आणि महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, पर्यटक ही आपली वाहने रस्त्यालगत उभी करून बाजारात लहान मोठी खरेदी करीत असतात. त्यामुळे मुंबई गोवा तसेच दिघी पुणे मार्गावरून प्रवास करणारे वाहनांना अडथळा निर्माण होतो. थर्टीफस्ट मुळे पर्यटकांनी आपली कूच रायगड सह संपूर्ण कोकणाकडे मोठया प्रमाणात केली आहे. मुंबई, ठाणें, वसई, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातून पर्यटक, प्रवासी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर अजूनही प्रवासी प्रवासातच अडकले आहेत. या मोठया प्रमाणात पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे इथल्या वाहतूक कोंडीवर मोठया प्रमाणात परिणाम झाला असून तासंतास प्रवासात रस्त्यावरच पर्यटक, प्रवाशांना अडवून पडावे लागले आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची ही चांगलीच दमछाक होऊन तारांबळ उडाली आहे.