अमोल चांदोरकर
श्रीवर्धन : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. आधुनिक साधने विशेषतः सोशल मीडिया आरोग्यास बाधक ठरत आहे. विविध मानसिक आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मानसिक त्यासोबतच शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यामध्ये योग महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन न्यायमूर्ती सोनाली जवळगेकर यांनी केले आहे.

जागतिक योग दिनाचे औचित्य साधत श्रीवर्धन न्यायालयामध्ये सकाळी ७ ते ८:३० वाजेपर्यंत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. न्यायमूर्ती सोनाली जवळगेकर यांनी उपस्थित वकील वर्ग, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. न्यायमूर्ती जवळेकर म्हणाल्या कि, सद्यस्थितीतील जीवनशैलीमध्ये आपण विविध समस्यांना सामोरे जात आहोत. मान, डोळे या इंद्रियांच्या आजारपणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. योगा, ध्यानधारणा, प्राणायाम या सर्व बाबी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपण नियमित योगा केल्यास मानसिक स्थैर्य लाभते. सदरच्या शिबिर प्रसंगी स्नेहल वेलणकर यांनी उपस्थित सर्वांना ध्यान व योगासनाबाबत माहिती दिली. ध्यान करत असताना आपण काय काळजी घ्यावी, ध्यानाचे आणि योगाचे आपल्या शरीरावर होणारे प्रतिकूल परिणाम याविषयी स्नेहल वेलणकर यांनी मार्मिक भाष्य केले. सदर शिबिरप्रसंगी वकील आशिष वढावकर, मनीष लाड, न्यायालयातील सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते.