दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी जनजागृती सेवा संस्थेने केले सन्मानित
किरण लाड
नागोठणे : नागोठणेचे जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. नवीन सोष्टे यांचे शिष्य, पत्रकार महेंद्र म्हात्रे यांना पत्रकार दिनाच्या दिवशी जनजागृती सेवा संस्था, ठाणे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार, दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी नागोठणेचे पत्रकार महेंद्र म्हात्रे यांना जनजागृती सेवा संस्था,ठाणे यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. या संगणकीय यूगात, महागाईची झळ सोसून, स्वखर्चाने दैनिकातून जनजागृती करण्याचे कार्य करीत आहात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या सेवाभावी सत्कार्याची दखल घेऊन आपणास पत्रकारितेतील हे मानाचे सन्मानपत्र देताना आम्हाला आनंद होत आहे. तसेच आपले हे कार्य नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. असेही सन्मानपत्रात पुढे म्हटले आहे.
महेंद्र म्हात्रे हे रायगड जनोदयचे कार्यकारी संपादक असून पत्रकाराबरोबर उत्तम लेखक आहेत. ते मराठी उद्योजक असून नागोठणे पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तसेच शिवगणेश उत्सव मंंडळ बाजारपेठचे माजी अध्यक्ष आहेत. पत्रकारिता कारीत असताना सामाजिक कार्यातील त्यांचे योगदान मोठे आहे. याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती तसेच पत्रकार दिनाच्या दिवशी त्यांचा यथोचित सन्मान झाला त्याबद्दल त्यांच्यावर नागोठणे व रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.