• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्हा नियोजन समितीच्या सन 2024-25 च्या प्रारुप आराखडयास मंजूरी

ByEditor

Jan 8, 2024

रायगड : रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण रु.386.06 कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीस महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रविंद्र पाटील, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, महेश बालदी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के तसेच शासकीय विभागांचे विभाग व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

सन 2024-25 साठी सर्व यंत्रणांकडून आलेल्या मागणीनुसार प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजन विभागाने रायगड जिल्ह्याला दिलेल्या वित्तीय मर्यादनुसार जिल्हा नियोजन समितीने रु. 325.00 कोटीच्या आराखड्यास मान्यता दिली. अनुसुचित जाती उपयोजनेच्या 27 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच आदिवासी उपयोजनेच्या 34.06 कोटी रूपयांच्या आराखड्यास मान्यता दिली. सन 2024-25 साठी या तिन्ही योजनांचा मिळुन रु.386.06 कोटीच्या आराखड्यास समितीने मान्यता दिली.

जिल्ह्याच्या प्राधान्याच्या योजना लक्षात घेता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी रु. 112.34 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी राज्यस्तरावर केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा मंत्री (वित्त व नियोजन) अजित पवार, यांच्या अध्यक्षतेखाली दि. ९ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या बैठकीत वाढीव निधीसाठी मागणी करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 सर्वसाधारणसाठी अर्थसंकल्पिय तरतूद 360 कोटी, तरतूद मंजूर करण्यात आली असून रु.252.08 कोटी इतका निधी प्राप्त झाला होता. या प्राप्त निधीपैकी डिसेंबर 2023 अखेर 103.45 कोटी प्रत्यक्ष खर्च झाला असून त्याची टक्केवारी 41 टक्के इतकी आहे. हा निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आपापसातील योग्य त्या समन्वयाने हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर विहीत कालावधीत खर्च करावा, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या डिसेंबर2023 अखेरचा आढावा सादर केला. प्रास्ताविक जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहेत्रे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!