सलीम शेख
माणगाव : माणगाव येथे फिर्यादी यांच्या राहते घरातून ४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन अज्ञात चोरटा फरार झाला आहे. सदरची घटना मंगळवार, दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दि. २७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेची फिर्याद पवन अर्जुन सोनावणे (वय -३८) रा. माणगाव यांनी सोमवार दि. ८ जानेवारी २०२४ रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी पवन अर्जुन सोनावणे यांच्या राहते घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने ठेवलेल्या गुलाबी रंगाच्या पाऊचमधील १ लाख १२ हजर ४०० रुपये किमतीची जुनी वापरती एक सोन्याची गंथन, १ लाख १९ हजार ६०० रुपये किमतीच्या जुन्या वापरत्या सोन्याच्या बांगड्यांचे जोड, ५८ हजार ८०० रुपये किमतीचे जुने वापरते एक सोन्याचा हार, २० हजार ९२० रुपये किमतीचा जुना वापरता एक सोन्याचा टॉप, ७२ हजार ८०० रुपये किमतीची जुनी वापरती एक सोन्याची चैन असे एकूण ३ लाख ८४ हजार ५२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. २/२०२४ भादवि संहिता कलम ३८० प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुले व सहाय्यक पोलीस निरीक्षक लहांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.