सलीम शेख
माणगाव : आमदार पात्रतेबाबत शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्याने माणगाव तालुक्यातील संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय भवन तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी माणगाव तालुकाप्रमुख गजानन अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा तीव्र शब्दांत व त्यांच्या फोटोला जोडे मारीत जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के म्हणाले कि, शिंदे गटाच्या आमदार पात्रतेबाबतचा काल जो विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला तो लोकशाहीचा गळा कापणारा होता. देशामध्ये लोकशाही आहे कि नाही हा प्रश्न सर्वांसमोर उभा असून देशात एक प्रकारची हुकूमशाही चालली आहे. भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जोमाने वाढेल. शिवसेना हि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे. नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही.
तालुकाप्रमुख गजानन अधिकारी यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घटना दिली. त्या संविधानामुळे नार्वेकरांना हे पद मिळाल्यावर त्यांनी हि गद्दारी केली. पक्षपाती पणाची भूमिका बजावून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर अन्याय केला आहे. या गद्दारांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या निषेध आंदोलनात उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के, जिल्हा महिला संघटक डॉ. स्वीटी गिलासे, महिला आघाडी प्रमुख रंजना लुष्टे, जेष्ठ शिवसैनिक अनिल मोरे, किसन घोले, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत पवार, विभाग प्रमुख लक्ष्मण महाळुंगे, पूर्व विभाग प्रमुख बाबू कळंबे, विभाग प्रमुख नंदू वाढवळ, अजिंकेश जाधव, अनिल सोनार, अरिफ मणेर, पप्पा महामुणकर, दिनेश पवार, संदीप खडतर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.