• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

फुंडे पुलाच्या दुरुस्ती संदर्भात संशयाचे जाळे?

ByEditor

Jan 11, 2024

कमजोर झालेल्या फुंडे पुलाच्या दुरुस्तीसाठी पावणेतीन कोटींची लागणार थुकपट्टी
सिडको अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा संशय

अनंत नारंगीकर
उरण :
अत्यंत वर्दळीच्या उरण-पनवेल राज्य मार्गावर असणारा फुंडे गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून या पुलावरून अवजड वाहतूक बंद ठेवली आहे.मात्र आता या पुलाचे नूतनीकरण करण्या ऐवजी सिडको मार्फत या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.त्यासाठी सुमारे २ कोटी ७० लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.मात्र या कमकुवत पुलावर इतका खर्च करणे म्हणजे केवळ थूकपट्टी असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

उरण-पनवेल या मार्गावरून दररोज शेकडो लहान मोठी वाहने पनवेल,नवीमुंबई,ठाणे या विभागात जाण्यासाठी मार्गक्रमण करीत असतात.अशा या अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावरील फुंडे गावाजवळील द्रोणागिरी नोड येथील पूल कमकुवत होऊन दोन वर्षांपूर्वी या पुलाचा काही भाग खचला होता.त्यामुळे या मार्गावर अपघात होऊ नये म्हणून पुलाच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग उरण आणि सिडकोने घेतला.तदनंतर या पुलाचे नुतनीकरण कोणी करावे या वादात सिडको व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी दोन वर्षाचा काळ घालवला.

मात्र नुकताच सिडकोने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे पावणे तीन कोटींचा निधी मंजूर करून पुलाच्या काही भागाच्या दुरुस्तीचे काम सुरु केल्याची माहिती मिळत आहे.मात्र सदर दुरुस्तीचे काम म्हणजे पुलाच्या कमकुवत भागावर सिमेंट काँक्रिटची मलमपट्टी असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे या पुलाचे आयुष्यच संपले असताना अशा पुलाच्या दुरुस्तिवे करोडोंचा खर्च सिडको अधिकारी का करीत आहेत असा सवाल व्यक्त होत असून इतक्या निधी मध्ये तो पूल नव्याने बांधता येईल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मात्र कंत्राटदाराशी साटेलोटे करून अशा कामांना करोडोंची थूकपट्टी लावून पैसा कमावताना जनतेच्या जीवाशी सिडको अधिकारी खेळ खेळत असून या पुलावर येणाऱ्या काळात अपघात झाला तर त्याला जबाबदार हे सिडकोचे अभियंता असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत द्रोणगिरी विभागाचे सिडकोचे कार्यकारी अभियंता मोहन मुंडे यांना विचारले असता या संदर्भात माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारीच देवू शकतात असे सांगितले तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे याना संपर्क केला असता त्यांनी याबाबत अभियंत्यांकडून माहिती घेवून सांगावे लागेल असे सांगून आपले हात झटकले आहेत. एकंदरीत नादुरुस्त व कमकुवत पुलाच्या दुरुस्तीच्या थूकपट्टीत सिडको अधिकारी सहभागी तर नाहीत ना असा संशय निर्माण होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!