अनंत नारंगीकर
उरण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) खारकोपर-उरण या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. मात्र उरणकरांचे स्वप्न साकारणाऱ्या उरण रेल्वे स्थानक परिसरात व्यवसायिकांची अनाधिकृत बांधकामे उभी असल्याने त्याचा त्रास हा प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागणार आहे. तरी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने सदर अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण तालुक्याला जोडणारी प्रवाशी रेल्वे सेवा सुरु व्हावी अशी गेले अनेक वर्षे उरणकरांची मागणी होती.उरणच्या जनतेच अधुरं राहिलेले स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) साकारणार असल्याने उरणकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण रेल्वे स्थानक परिसरातील व्यवसायिकांची अनाधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पुढाकार न घेतल्याने सदर अनाधिकृत बांधकामांचा आणि भविष्यात रेल्वे स्थानक परिसरातील मोकळ्या जागेवर उभ्या राहणाऱ्या अनाधिकृत बांधकामांचा त्रास हा प्रवाशी नागरीकांना सहन करावा लागणार आहे.तरी सिडकोच्या अतिक्रमण विभागाने उरण रेल्वे स्थानक परिसरातील अनाधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
