कंपनी अधिकारी यांच्यासह कारखाना निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
शशिकांत मोरे
धाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीत ७ जून रोजी आगीची भीषण दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रयाग डोलकर या तरुण कामगाराला जीव गमवावा लागला. याच रोहा डायकेम कंपनीत सक्षम सुरक्षा यंत्रणा नाही. सुरक्षेची नियमान्वये साधने नाहीत. संकटकाळात स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नाही. याबाबत कंपनीला वारंवार सूचित करण्यात आले. मात्र कंपनी प्रशासनाने कंपनी मुख्यतः कामगार सुरक्षेला प्राधान्यक्रम दिले नाही, त्याच बेजबाबदारपणामुळे आगीची स्फोटक दुर्घटना घडली हे समोर आले आहे.
रोहा डायकेम कंपनीच्या कामगार सुरक्षा यांसह सर्वच कंपनी सुरक्षा यंत्रणाकडे कारखाना निरीक्षक प्रशासनानेही जबाबदारीतून पाहिले नाही. सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या नाही. सुधारणा करून घेतल्या नाहीत त्यामुळेच आगीची स्फोटक घटना घडली. त्यात तरुण कामगाराचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला कंपनी प्रशासन अधिकारी यांसह कारखाना निरीक्षक केशव केंद्रे हेच जबाबदार आहेत. रोहा डायकेम कंपनीच्या आगीच्या मोठ्या दुर्घटनेतील तरुण कामगाराच्या मृत्यूला जबाबदार धरत कंपनी प्रशासन अधिकारी, कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांच्यावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रोहा प्रेस क्लबने लेखी निवेदनाद्वारे रोहा पोलीस प्रशासन व रोहा तहसीलदार यांच्याकडे केली. यावेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, माजी अध्यक्ष शशिकांत मोरे, सरचिटणीस रविंद्र कान्हेकर, सल्लागार रामनरेश कुशवाह, सदस्य जितेंद्र जाधव व पत्रकार उपस्थित होते.
रोहा डायकेम दुर्घटना प्रकरणाची सखोल चौकशी करून कंपनी प्रशासन व कारखाना निरीक्षक यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकडून सर्वच कंपन्यांचे अधिकारी, कारखाना निरीक्षक प्रशासन सुरक्षेबाबत सतर्क राहून कामगार व कंपन्या सुरक्षीत राहतील असे आवाहन केले. कंपनीच्या दुर्घटनेतील तरुण कामगार याच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत धरत कंपनी अधिकारी समवेत सुरक्षा निरीक्षणात सुरक्षा यंत्रणेच्या तपासणीत दुर्लक्ष करणाऱ्या कारखाना निरीक्षक केशव केंद्रे यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रोहा प्रेस क्लबने निवेदनाद्वारे केली.