शशिकांत मोरे
धाटाव : रायगड जिल्ह्यातील कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त रोठ बुद्रुक येथील अश्वत्थ मारुती मंदिर मैदानावर नमो कब्बडी चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत ३२ संघाने सहभाग घेतला. चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत चौंडेश्वरी कडसुरे संघाने अखेर विजयाची मोहोर उमटवली.
या स्पर्धेचे उद्घाटन रोह्यातील सुप्रसिद्ध डॉ. अशोक जाधव व माजी सैनिक साळुंखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कबड्डी स्पर्धेत चुरशीच्या लढतीत रोह्यातील चौंडेश्वरी कडसुरे संघाने काळभैरव उडदवणे संघावर मात करून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक काळभैरव उडदवणे संघ, तृतीय क्रमांक जय हनुमान वाशी तर चतुर्थ क्रमांक चिंचमाता बोर्लिपंचतन संघाने पटकावला. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू कडसुरे संघाच्या निखिल शिर्के याला उत्कृष्ट चढाई, उडदवणे संघाच्या कुमार कोल्हटकरला उत्कृष्ट पकड्ड, जय हनुमान वाशी संघाचा महेश जोगडे याला पब्लिक हिरो तर बोर्लिपंचतन संघाचा राज श्रीवर्धनकर याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. याठिकाणी असंख्य मान्यवर व घाग यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी व क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती.