खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवारी ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन
शशिकांत मोरे
धाटाव : गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या रोहा तालुक्यातील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या ग्रामनिधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन सोहळा रविवार, दि. २५ जून रोजी सायं. ४ वाजताच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आला आहे. एक देखणी प्रशासकीय वास्तू उभी राहील्यामुळे येथील कामकाज सुस्थितीत होणार असल्याने नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे.
रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते भाई पाशिलकर, आ. अनिकेत तटकरे, माजी पालकमंत्री अदिती तटकरे, मधुकर पाटील, विजय मोरे, विनोद पाशिलकर, शंकर भगत, अनिल भगत, सुरेश मगर, दीपिका चिपळूणकर, विजया पाशिलकर, यशवंत रटाटे, रोहा तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुरवड, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, उप अभियंता वैभव पाटील, अनिल जांभळे यांसह विभागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
याठिकाणी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम लोक प्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे या अंतर्गत यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम सन २०२१ /२०२२ अंतर्गत मौजे धाटाव बारसोलीवाडी येथील बापुजी देव मंदीर सुशोभीकरण व परिसर सुधारण करणे या कामाचे उद्घाटन सोहळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१ /२०२२ अंतर्गत मौजे धाटाव विष्णुनगर येथे दलित रस्ता तयार करणे, १५ वा वित्त आयोग (ग्रा.पं स्तर व ग्रामनिधी) सन २०२१/२०२२ रोहा कोलाड रस्त्यापासून बारसोलीवाडी, विष्णुनगर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, ठक्कर बाप्पा योजना सन २०२३/२०२४ अंतर्गत मौजे धाटाव आदिवासीवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे, नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत सन २०२२/२०२३ अंतर्गत मौजे धाटाव नाथा नगरी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटार करणे या कामांचा भुमीपूजन सोहळा होणार आहे.
या भव्यदिव्य इमारतीमध्ये १७ दुकान गाळे, प्रशासकीय सभागृह असून याठिकाणी सामजिक बहुउद्देशीय सभागृहाला झुंजार लोकनेते भाईसाहेब पाशिलकर सभागृह असे नाव देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त प्रतीक्षालय, चेंजिंग रूम यासह ग्रामसेवक कार्यालय व निवास व्यवस्था, शौचालय यासह इतर सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत.
या इमारतीमध्ये शनिवारी सकाळी १० वाजता उदकशांती व गणेशपूजन तर रविवारी सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा होणार असून सायं ४ वाजता इमारतीचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर महिला मेळावा होणार आहे. तरी या भव्यदिव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे सरपंच सुवर्णा रटाटे, उपसरपंच अशोक मोरे, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर यांसह सर्व सदस्य, सदस्या यांनी आवाहन केले आहे.