• बोर्ली पंचतन येथील पुरातन शंकर मंदिरासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर
• खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने निधी -शामकांत भोकरे
अभय पाटील
बोर्ली पंचतन : महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक विकास योजनेंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभागातील दिघी येथील राम मंदिर परिसर सुधारणा कामासाठी 35 लक्ष, करलास येथील धेनबाईमाता मंदिर बांधकामासाठी 25 लक्ष तर बोर्ली पंचतन येथील पुरातन शंकर मंदिर बांधकाम साठी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या कामाना प्रशासकीय मान्यतेचे पत्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक विकास योजनेंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने पुरातन मंदिरे व वास्तू यांचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून भरघोस निधी मंजूर करण्यात आला असून त्याबाबतची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन विभागातील दिघी येथील राम मंदिर परिसर सुधारणा कामासाठी 35 लक्ष, करलास येथील धेनबाईमाता मंदिर बांधकामासाठी 25 लक्ष तर बोर्ली पंचतन येथील पुरातन शंकर मंदिर बांधकामासाठी 25 लक्ष रुपयांचा निधीचा ही समावेश आहे. शंकर मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष इंद्रकांत हावरे, समितीचे सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य शामकांत भोकरे, श्रीकांत तोडणकर, प्रसाद हावरे यांचे कडे प्रशासकीय मान्यता खासदार सुनील तटकरे यांनी सुतारवाडी येथील गीताबाग येथे सुपूर्द केली.
रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील विकासकामे होत असताना रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने बोर्ली पंचतन येथील श्री शंकर मंदिराकरिता 25 लाखाचे मंजुरीचे पत्र मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस रायगडचे मुख्य प्रवक्ते शामकांत भोकरे यांनी सांगितले. तर शंकर मंदिराचे कामास लवकरात लवकरच सुरुवात होईल असा खासदार सुनील तटकरे यांनी विश्वास दिला.