• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमध्ये सुपर वॉरियर्स माध्यमातून रायगड लोकसभेसाठी धैर्यशील पाटलांच्या नावाची कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी!

ByEditor

Jan 25, 2024

मुख्यमंत्री आपला नसला तरी सरकार आपले आहे -प्रवीण दरेकर

मिलिंद माने
महाड :
भारतीय जनता पार्टीच्या 194 महाड विधानसभा मतदारसंघात सुपर वॉरियर्स माध्यमातून भाजपा विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महाडमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दक्षिण रायगड भाजपाचे अध्यक्ष व माजी आमदार धैर्यशील पाटील यांची रायगड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार धैर्यशील पाटील असतील अशीच घोषणा कार्यकर्त्यांमधून झाल्याने रायगड लोकसभा मतदारसंघात धैर्यशील पाटील हेच उमेदवार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

यावेळी सुपर वॉरियर्सच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विधानपरिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, केंद्रात आपले सरकार आहे राज्यात मुख्यमंत्री आपला नसला तरी सरकार आपले आहे असा विश्वास त्यांनी यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना देऊन तुम्ही विकासाची चिंता करू नका भविष्यात वॉरियर्सची संख्या वाढून पक्षाची बांधणी योग्यरीतीने होईल असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.

महाड विधानसभा मतदारसंघात आमदार जरी आपला नसला तरी महाड पोलादपूरमधील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम विधिमंडळाच्या माध्यमातून मी केले आहे. महाड पोलादपूरवासियांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देऊन या मतदारसंघातील आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. आपल्याकडे विकासाची संकल्पना म्हणजे गावात सभा मंडप, रस्ता, तसेच गावामध्ये छोटे काही काम केले म्हणजे विकास झाला असे आहे तर विकासाची संकल्पना म्हणजे शैक्षणिक संस्था व युवकांना रोजगार, सहकाराच्या माध्यमातून काम करणे याला विकास म्हणतात. मी सहकाराच्या माध्यमातून महिलांना संधी देण्याचे काम केले आहे आणि यापुढेही करीन असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. महाड विधानसभा मतदारसंघात यापुढे गावागावात वाड्यावाड्यांमध्ये भाजपा पक्ष वाढला असल्याचे पहावयास मिळेल असा विरोधकांना टोला लगावत त्यांनी त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले.

रायगड जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल -धैर्यशील पाटील

दक्षिण रायगड भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधताना सांगितले की, भविष्यात रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असेल व रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २० जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित केलेल्या या सुपर वॉरियर्स कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, पोलादपूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे महाड व पोलादपूरमधील प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे 100 वॉरियर्स होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!