अनंत नारंगीकर
उरण : उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण तालुक्यात विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तरतूदीमधून विंधणे-हरिश्चंद्र पिंपळे (धाकटीजूई) -बोरखार रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण करणे या साडेचार कोटी रुपयांच्या कामाचे आणि कोप्रोली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील ४० लाखाच्या रस्त्याच्या कामाचे रविवार, दि. २८ जानेवारी रोजी भूमीपूजन करण्यात आले.

उरण तालुक्यातील बोरखार रस्ता हा गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्थेत होता. त्यामुळे या गावातील लोकांना, विद्यार्थ्यांना प्रवास करणे अडचणीचे ठरत होते. आमदार महेश बालदी यांनी या लोकांची अडचण लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी आणि डांबरीकरणासाठी ४ कोटी ५० लाख रूपयांची मंजूरी मिळवली होती. तर कोप्रोली येथेही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी ४० लाख रूपये मंजूर केले आहेत. या कामांचे भूमीपूजन महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. तर रानसई वाडीवर आर्शिया कंपनीच्या सीएसआर फंडातून सार्वजनिक सभामंडपाचे काम करण्यात येत आहे. या कामाची पहाणी देखिल आमदार महेश बालदी यांनी आज केली.

या भूमीपूजन कार्यक्रमाला आमदार महेश बालदी, भाजपाचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उद्योजक पी. पी. खारपाटील, राजेंद्र खारपाटील, उरण भाजपा महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, प्रसाद पाटील, वेश्वी सरपंच अजित पाटील, सूरज म्हात्रे, शैलेश गावंड, अतुल ठाकूर, विंधणे सरपंच रोशन डाकी, समिर मढवी, शशिकांत म्हात्रे, मनोहर म्हात्रे, ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी चिरनेर ऐतिहासिक प्रसिद्ध गावातील नाट्य लेखक, दिग्दर्शक मनोहर फुंडेकर यांनी आमदार महेश बालदी यांच्या लोकहिताच्या कामावर विश्वास ठेऊ भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.