महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मिलिंद माने
महाड : मेडिकल दुकानांची मालिका असलेल्या महाडमधील वेलनेस फॉरेव्हर या मेडिकल दुकानातून चुकीची गोळी दिल्यामुळे वडिलांना त्रास झाल्याची तक्रार रुग्णाच्या मुलाने महाड शहर पोलीस ठाण्यात केली आहे. मात्र, आमच्याकडून कोणत्याच प्रकारची चुकीची गोळी दिली नसल्याची प्रतिक्रिया वेलनेस फॉरेव्हरच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
महाड शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील रोहिदास नगर भागात राहणाऱ्या सुरेश कांबळे यांनी वेलनेस फॉरेव्हर या मेडिकल दुकानामध्ये संपलेल्या गोळ्यांचे पाकीट घेऊन गेले असता त्यांना देण्यात आलेल्या गोळीमुळे त्रास झाला. त्यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी गोळीचे नाव बदलून दिले आणि उपचार सुरू ठेवले. याबाबत त्यांचा मुलगा स्वप्निल सुरेश कांबळे याने पुन्हा मेडिकलमध्ये जाऊन जाब विचारला मात्र, मेडिकल दुकानामधील कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे त्याने थेट पोलीस ठाणे गाठून झालेल्या त्रासाबद्दल आणि दिलेल्या चुकीच्या गोळीबद्दल तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी पोलीस स्टेशनकडून आमच्याकडे सदर प्रकरण चौकशीला आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. तर वेलनेस फॉरेव्हर दुकानाचे महाडमधील भरत मेहता यांनी रुग्णाने प्रिस्क्रिप्शन न आणता फक्त गोळीची स्ट्रीप आणली होती, त्या स्ट्रीप नुसार योग्य गोळी दिल्याचे सांगून तक्रार धुडकावून लावली.
याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम 276 नुसार समा रोहन मेहता आणि यश जैन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाड तालुक्यातील व शहरातील अनेक मेडिकल दुकानांमध्ये ज्याच्या नावावर मेडिकल शॉपचे लायसन्स आहे अशी व्यक्ती मेडिकल चालवत नसून ज्याला काहीही या मेडिकलबद्दल माहिती नाही अशा अनेक व्यक्ती मेडिकल शॉप चालवत आहेत. मात्र, अन्न औषध प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे अनेक ग्राहकांकडून ऐकण्यास मिळत आहे. अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार मेडिकल दुकानांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या गोळ्या औषधे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू विक्रीसाठी ठेवू नये असा नियम असताना अनेक मेडिकल स्टोअरमध्ये अंडी, ब्रेड, चॉकलेट, वेगवेगळ्या कंपन्यांचे थंड पेय तसेच ग्रामीण भागातील अनेक मेडिकल दुकानांमध्ये किराणा मालातील अनेक वस्तू मग त्या अंड्यापासून साखरेपर्यंत देखील विक्रीला ठेवल्या जातात तर काही मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम पार्लरचा देखील धंदा या मेडिकल स्टोअरवाल्यांनी उघडलेला आहे. वारंवार अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करून देखील अन्न औषध प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. केवळ कारवाईचं नाटक पार पाडत असल्याने अनेक मेडिकल स्टोअर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
अन्न औषध प्रशासनाच्या नियमानुसार मेडिकल स्टोअर वातानुकूलित असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक मेडिकल स्टोअरमध्ये वातानुकूलित यंत्रणा नसल्याने वैद्यकीय सेवेसाठी लागणाऱ्या औषधांवर त्याचा परिणाम होत असून अनेक औषधे धुळीच्या साम्राज्यात पडल्याची पाहण्यास मिळत आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन आता नेमकी कोणती कारवाई करते? असा प्रश्न अनेक ग्राहक विचारत आहेत.
बातमी दाराने शेवटची काही बातमी ऐकीव माहितीवर केल्या सारखे वाटले. औषधं दुकान वातानुकुलीत असायलाच हवे असे कायद्यात नाही.
शिवाय fda चा अन्न विभाग food लायसन्स देते.. बातमीत उल्लेख केलेले अन्न प्रकार असा विक्रेता ठेवू शकतो. गोळी चे पाकिट देणे ही चूक असेल तर चिट्ठी शिवाय गोळी मागणे हे देखील चूक.
यात दुकानदा रा ला फार काही होत नाही. वेलनेस उत्तम प्रकारे चालवली जाणारी औषध साखळी आहे.
भारतीय लोकांना वाटते वर्ल्ड क्लास लेवल वर आपला देश जावा अन आपले मेडिकल दुकानदार बंधू तसा करण्याचा प्रयत्न करत असतिल तर आपलीच लोक मागे बोंबा मरत सुटणार! त्यातलाच हा प्रकार!ह्या पत्रकार बंधू ह्याना विनंती आहे की महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे त्यावर पण कधी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करावा कुठल्याही टपरीवर तुम्हाला गुटखा मिळेल पण ह्याची बातमी करावी
असं कधी का वाटलं नाही वाटते अश्याच मुद्द्यावर थोडा प्रकाश टाकावा मेडिकल व्यवसाय व्हाइट कॉलर बिझनेस मध्ये गणला जातो! आम्हाला किती नियम पाळावे लागतात हे एकदा जाणून घेऊन असे न्यूज पोस्ट करावी! Ice क्रीम अन अन्य खाद्य पदार्थ अन त्याची मार्जिन किती आहे ते पण बघून घ्या ! किराणा वाला क्रोसिन disrpin सारख्या मेडिसिन विदाउट licence विकतो किती तरी किराणा वाले असतिल त्यांच्याकडे फूड licence पण काढलेले नसेल ! एकदा भेटून सविस्तर चर्चा करू शकतो एवढा आहे बोलायला!