संतोष रांजणकर
मुरूड : मुरुड विहूर मार्गावर राजवाड्याजवळील बाह्य वळणावर रविवारी सायंकाळी एक ऑटो रिक्षा आणि वॅगनर गाडीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ऑटो रिक्षा चालकासह अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे पती किशोर पाटील यांचा समावेश असून त्यांच्यासह रिक्षाचालक व प्रवासी यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथे हलविण्यात आले आहे.
ऑटो रिक्षा एमएच ०६ झेड ३७८९ ही मुरुडच्या दिशेने जात असताना व एमएच ०२ बीटी ९९१८ क्रमांकाच्या वॅगनर गाडीने विहूर दिशेने जात असताना राजवाड्याजवळील बाह्य वळणावर भरधाव वेगात जोरदार धडक दिली. यावेळी जोरदार पाऊस पडत होता. वळणावर दोन्ही चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे सदरचा अपघात झाला. जखमींवर मुरुडच्या फातिमा बेगम ग्रामीण रुग्णालयात त्वरित उपचार करण्यात आले. मुरुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.