• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ज्येष्ठांचा आदर्श नजरेसमोर ठेवून धाटावच्या ग्रामसचिवालयातून भविष्यातील विकासकामे होतील -खा. सुनील तटकरे

ByEditor

Jun 26, 2023

धाटाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न

शशिकांत मोरे
धाटाव :
महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबवित तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात विविध योजना राबवून गुणवत्तेच्या आधारे सतत विविध पारितोषिके मिळविणारी आमची यशवंत ग्रामपंचायत धाटाव आहे. या ग्रांमपंचायतीने एकीचे बळ किती उत्कृष्ट असते याचे ज्वलंत उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दिले. एकेकाळी सर्वच महिला निवडून येऊन महिलाराज आणून महिलांना संधी देत ग्रामपंचायत कारभाराची सूत्रं महिलांच्या हाती दिली. भाईसाहेब पाशीलकर यांनी दिलेल्या योगदानामुळे या ग्रामपंचायतमध्ये विविध उपक्रम राबविले गेले. यापुढे ज्येष्ठ मंडळींचा आदर्श नजरेसमोर ठेवून धाटावच्या ग्रामसचिवालयातून भविष्यातील विकासकामे होत राहतील असा आशावाद खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

गेली अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या ग्रामसचिवालय इमारतीच्या उद्घाटनाला अखेर रविवारचा मुहूर्त सापडला आणि ग्रामनिधी अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर व्यासपीठावरून आपल्या आक्रमक शैलीत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. धाटाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय नूतन कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. रविवारी सायंकाळी धाटाव ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विजय मोरे, विनोद पाशिलकर, शंकर भगत, सुरेश मगर, प्रदीप देशमुख, दीपिका चिपळूणकर, प्रीतम पाटील, अनिल भगत, रोहिदास पाशिलकर, रामचंद्र चितळकर, रामचंद्र सकपाळ, लीलाधर मोरे, जयवंत मुंढे, अमित मोहिते, सतीश भगत, महेश बामुगडे, नरेंद्र जाधव, मनोज शिर्के, केशव भोकटे, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, सरपंच सुवर्णा रटाटे, उपसरपंच अशोक मोरे यांच्यासह सर्व सदस्य, विभागातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे आपल्या भाषणात तटकरे म्हणाले की, याच ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीच्या जागी तालुका व जिल्ह्यातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे व प्रशिक्षण घेता येईल अशी अद्ययावत राज्यातील सर्वात मोठी कार्यशाळा उभारणार असून रोहा कोलाड रस्त्याने जाता येता दोन्ही बाजूने पहात राहावे अशा इमारती सुसज्ज दिसतील असे म्हणत त्यांनी राजकारणात या परिसरातील सर्वच बुजुर्ग नेते मंडळींनी केलेल्या विशेष सहकार्याची जाणीव करून देत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

याठिकाणी खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम मा. लोक प्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत व नागरी सुविधा पुरविणे या अंतर्गत यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम सन २०२१ /२०२२ अंतर्गत मौजे धाटाव बारसोलीवाडी येथील बापुजी देव मंदीर सुशोभीकरण व परिसर सुधारण करणे या कामाचे उद्घाटन सोहळा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१ /२०२२ अंतर्गत मौजे धाटाव विष्णुनगर येथे दलित रस्ता तयार करणे, १५ वा वित्त आयोग (ग्रा.पं स्तर व ग्रामनिधी) सन २०२१/२०२२ रोहा कोलाड रस्त्यापासून बारसोलीवाडी, विष्णुनगर स्मशानभुमिकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण करणे, ठक्कर बाप्पा योजना सन २०२३/२०२४ अंतर्गत मौजे धाटाव आदिवासीवाडीकडे जाणारा रस्ता तयार करणे, नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत सन २०२२/२०२३ अंतर्गत मौजे धाटाव नाथा नगरी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटार करणे या कामांची श्रीफळ वाढवून भुमीपूजने करण्यात आली.

या भव्यदिव्य इमारतीमध्ये १७ दुकान गाळे, प्रशासकीय सभागृह असून येथील सामजिक बहुउद्देशीय सभागृहाला झुंजार लोकनेते भाईसाहेब पाशिलकर सभागृह असे नाव देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त प्रतीक्षालय, चेंजिंग रूम यासह ग्रामसेवक कार्यालय व निवास व्यवस्था, शौचालय यासह इतर सुविधा केंद्र असलेली ही प्रशस्त वास्तू उभारण्यात आली आहे.

ग्राम पंचायतीच्या स्थापनेपासून तत्कालीन व आजवर कार्यरत असलेल्या सरपंच व उपसरपंच यामध्ये भाईसाहेब पाशिलकर, स्व. शिवराम रटाटे, स्व. यशवंत जाधव, विजयराव मोरे, वैशाली मोरे, महादेव रटाटे, वैशाली पाशिलकर, संगीता रटाटे, प्रभा जाधव, अनघा पवार, विनोद पाशिलकर, सुदाम रटाटे, उत्तम मोरे, यशवंत रटाटे, अशोक मोरे यांसह ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर यांचा अथोचीत सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर यांनी केले तर सूत्रसंचालन सूर्यकांत मोरे यांनी केले. उपस्थितांचे आभार धर्मराज माने यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांसह ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!