मुख्यमंत्री चषकाचा मानकरी कोण ठरणार? क्रिकेटप्रेमीची उत्सुकता शिगेला
किरण लाड
नागोठणे : येथील जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित, प्रविण ताडकर यांच्या प्रयत्नातून दि. ९, १०, ११ फेब्रुवारीला क्रिकेटचे भव्य सामने मुरावाडी-नागोठणे येथे आयोजित केले आहेत. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे विजेत्या संघाला रोख बक्षीसाबरोबर भव्य असा मुख्यमंत्री चषक मिळणार आहे.
प्रथम येणाऱ्या 24 संघाना प्रवेश देण्यात येणार आहे. दि. ९ व १० फेब्रुवारीला स्थानिक १६ संघाना प्राधान्य दिले जाणार आहे. दि. ११ फेब्रुवारीला खुले 8 संघ खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे नागोठणे विभागात एवढ्या मोठ्या बक्षिसांच्या क्रिकेटच्या स्पर्धा प्रथमच भरविण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या संघाला १ लाख, द्वितीय क्रमांकाच्या संघाला ५० हजार तर तृतीय क्रमांकाच्या संघाला २५ हजार अशा भरघोस रक्कमेच्या पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलदांज, गोलदांज, क्षेत्ररक्षक, सामनावीर, मालिकावीर या पारितोषिकांनी खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेची प्रवेश फी रुपये आठ हजार पाचशे रुपये राहणार आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ठाणे येथील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार, प्रवक्ते, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, सरपंच, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित राहणार असून तीन दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा येथील क्रीडा रसिकांना मेजवानी ठरणार आहे. या भव्य क्रिकेटच्या स्पर्धा नागोठणे जवळील मुरावाडी मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. तरी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संघांनी सहभाग घ्यावा असे आवाहन या स्पर्धेचे आयोजक शिवसेना नागोठणे विभागप्रमुख प्रविण ताडकर यांनी केले आहे.