• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

हरिहरेश्वर रेल्वे प्रकल्प अधांतरीच!

ByEditor

Feb 14, 2024

तत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदिंनी केलेली तरतूद

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे विकसित होत असलेल्या दिघी बंदराला जोडणार्या रोहा – दिघी रेल्वेमार्ग हा डेडीकेटेड मालवाहतूक मार्ग म्हणुन नियोजित केला. याबाबतची माहिती गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आली. मात्र त्यासोबतच रोहा ते हरिहरेश्वर रेल्वे मार्गाची चर्चा होऊ लागलीय.

रायगड जिल्ह्यातील राजपुरी खाडीवर दिघी व आगरदांडा या दोन खाडीकिनारी दिघी पोर्ट प्रकल्पाचे काम सध्या अदानी पोर्ट कंपनीकडुन सुरू आहे. रोहा दिघी रेल्वेमार्गाला शासनाने वेगाने चालना दिल्यास या पोर्टला मोठी चालना मिळेल. सुरूवातीला दिघी पोर्टला जोडणारा इंदापूर दिघी असा रेल्वेमार्ग दिघी पोर्ट चे पूर्वीचे विकासक बालाजी इंन्फ्रा कंपनीने प्रस्तावित केला होता व त्यानंतर स्थानिक जनतेने शासनाकडे व दिघी पोर्टच्या बालाजी इंन्फ्रा कंपनीकडे पाठपुरावा करून इंदापूर ते दिघी व वीर ते हरिहरेश्वर या दोन वेगवेगळ्या रेल्वेमार्गांऐवजी रोहा-दिघी-हरिहरेश्वर असा एकच रेल्वेमार्ग उभारावा अशी विनंती केली होती. परंतु बालाजी इंन्फ्रा कंपनीने केवळ पोर्टपुरता विचार करून रोहा दिघी रेल्वेमार्ग ‌त्यावेळी नव्याने प्रस्तावित केला होता. परंतु केवळ रोहा ते दिघी ऐवजी रोहा-दिघी-हरिहरेश्वर असा रेल्वेमार्ग झाल्यास त्या रेल्वेमार्गामुळे औद्योगिक मालवाहतूक व समुद्री पर्यटन, धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. केवळ श्रीवर्धन तालुकाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी, वेळास, हर्णे सारखी पर्यटनस्थळे मुंबई शहराला जोडली जाऊन मोठी पर्यटनवाढ होऊ शकेल.

मालवाहतूक व पर्यटन दोन्हीसाठी हा रेल्वेमार्ग कार्यान्वित केला गेला तर पुर्ण क्षमतेने तो वापरला जाईल व आर्थिक दृष्ट्या शासनाला तसेच तालुक्याला मोठ्या फायद्याचा ठरेल. रोहा ते दिघी हा पहिला टप्पा तातडीने मार्गी लावावा व दुसऱ्या टप्प्यात दिघी ते हरिहरेश्वर रेल्वेसाठी स्थानिक नेतृत्वाने सबळ पाठपुरावा करणे आवश्यक आहे. हरिहरेश्वर तिर्थक्षेत्राचे पौराणिक महात्म्य आहे. श्राध्दकर्मासाठी हे ठिकाण पवित्र मानले जाते. पेशवे घराण्याचे देखील या तिर्थक्षेत्री घनिष्ठ संबंध होते. अशा या पवित्र तिर्थक्षेत्राला रेल्वे जोडणी देऊन भाविकांची उत्तम अशी सोय राज्य व केंद्र सरकार व अदानी पोर्ट समुह परस्पर सामंजस्याने करावा अशी अपेक्षा केली जातेय.

त्यावेळी साडेसहा कोटी तरतूद
सन 2012-13 ला दिनेश त्रिवेदी यांनी रेल्वेमंत्री असताना तिर्थक्षेत्र जोडणी प्रकल्पा अंतर्गत वीर ते हरिहरेश्वर अशा नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी त्यावेळी साडेसहा कोटी रूपयांचा निधी तत्कालीन रेल्वे अर्थसंकल्पात मंजुर केला होता. बॅ. अंतुले यांनी देखिल त्यावेळी हरिहरेश्वर तिर्थक्षेत्र जोडणीसाठी विशेष पाठपुरावा केंद्र शासनाकडे केला होता.

रस्ते वाहतूकी बरोबर रेल्वे वाहतूकीचे सर्वत्र जाळे पसरणे फार गरजेचे आहे, श्रीवर्धन मध्ये तीर्थक्षेत्र असलेल्या हरिहरेश्वर कडे रेल्वे येणार असे ऐकिवात होतो परंतू गेले कित्येक वर्षे होऊनही श्रीवर्धन पर्यंत रेल्वे वाहतूक येऊ शकली नाही. केंद्रात व राज्यात आमचं युती सरकार आहे, निश्चितपणे श्रीवर्धन पर्यंत रेल्वे येण्याकरिता रेल्वे मंत्रालयाकडे आम्ही पाठपुरावा करू.

-जयदीप तांबुटकर,
तालुकाध्यक्ष, श्रीवर्धन भाजप

रेल्वे मार्ग होणे हि काळाची नक्कीच आवश्यकता आहे ज्या मुले श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे भाविकांचे भेट देण्याचे प्रमाण वाढण्यास खूप मोठी मदत होईल सोबतच आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना फायदा होईल कारण रेल्वे हे असे प्रवासाचे साधन आहे की ज्यात सर्वजण प्रवास करतात.

-सिद्धेश पोवार,
सचिव, हरिहरेश्वर देवस्थान

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!