• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऑलकार्गो प्रवेशद्वाराजवळ जीवघेणा प्रवास

ByEditor

Feb 14, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
ऑलकार्गो या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा- कोप्रोली रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या मोटारसायकलस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी अपघाताची वाट न पाहता सदर रस्त्याची पाहणी करून खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

उरण, जेएनपीए बंदर परिसराला जोडणारा उरण पुर्व विभागातील खोपटा-कोप्रोली हा सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या अगोदर करोड रुपयांचा निधी खर्च केला असून या परिसरातील गोदाम व्यवस्थापकांनी आपआपल्या परीने निधी खर्च केला असल्याची माहिती मिळत आहे. त्यात उरणचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या माध्यमातून एक वर्षांपूर्वी सुमारे ३ कोटी ७५ लाखांचा निधी ठेकेदारांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता.

मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटीच्या इंजिनिअर, वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्या दुर्लक्षितपणामुळे आजही करोडोंचा निधी खर्च करुनही सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यात नूकताच या रस्त्यावर झालेल्या अपघातात खोपटा गावातील निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले असतानाही नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी व सार्वजनिक बांधकाम विभाग उरणनी या रस्त्यावरील उध्दवस्त झालेल्या साईटपट्ट्या आणि ऑलकार्गो प्रवेशद्वारा जवळील अपघातग्रस्त खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी पुढाकार न घेतल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.

सदर रस्त्याच्या दुरवस्थेची लवकरात लवकर पाहाणी करुन संबंधित ठेकेदाराला पुन्हा रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सांगितले जाणार आहे.

-वाय. एन. घोटेकरमी,
वरिष्ठ अभियंता, नॅशनल हायवे इंडिया ऑथॉरिटी

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!