• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण शहरात पावती फाडा…टपरी उभारा!

ByEditor

Feb 14, 2024

घनःश्याम कडू
उरण :
नगरपालिका क्षेत्रातील अनेक मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपर्‍या उभारल्या जात आहेत. या टपरीधारकांकडून नगरपालिका कर म्हणून दररोज 20 ते 30 रुपये पावती फाडण्यात येते. काहीवेळा तर पावती न देताच वसुली केली जाते अथवा बोगस पावतीही दिली जात असल्याचे दिसते.

शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली अशा टपर्‍या उभ्या राहत असून ’पावती फाडा, टपरी उभी करा’ ही योजनाच पालिका क्षेत्रात सुरू असल्याचे दिसून येत आहे. या अघोषित योजनांचा फायदा घेत शहराबाहेरील फेरीवाले व व्यापारी ठिकठिकाणी व्यवसाय करताना दिसतात. उरण शहरारील न्यायालयासमोर, विवेकानंद चौक, राजपाल नाका, कामठा रस्ता, आंनदनगर, पालवी हॉस्पिटल, गांधी चौक ते गणपती मंदिर व मासळी मार्केट भररस्त्याच्या दोन्ही बाजूला, मोकळ्या जागेत पूर्वी आठवड्यातून कधी तरी बाहेरचे व्यापारी तात्पुरती बांबूची टपरी उभारून व्यवसाय करीत होते.

मात्र, वीस रुपयांची पावती फाडून व्यापार्‍यांनी दररोज व्यवसायासाठी बांबूच्या टपर्‍या उभारल्या असून, नगरपालिका प्रशासनाचे कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक व्यापारी तसेच नागरिकांकडून करण्यात येत आहे. महागाईमुळे आधीच बाजारात मंदी आहे, त्यात अन्य शहरातील व्यापारी येत असल्याने स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात टपर्‍या उभ्या करण्यात आल्या असून काही ठिकाणी तर पक्के व्यावसायिक गाळे बांधण्यात आले आहेत. यासंदर्भात नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता, अतिक्रमण विरोधी पथकास या संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी व्यवसाय करणारे मात्र, आम्ही रीतसर पालिकेची पावती फाडतो, असे सांगून जणू परवानाच मिळाल्याच्या थाटात व्यवसाय करताना दिसतात.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!