• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अटल सेतुवरून उरण बेस्टची बस सेवा लवकरच सुरू होणार

ByEditor

Feb 14, 2024

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश येणार

प्रतिनिधी
उरण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकत्याच लोकार्पण झालेल्या अटल सेतुवरून लवकरच उरणकरांसाठी बेस्टची प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अल्पावधीतच मुंबई गाठणे शक्य होणार आहे. यासाठी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पाठपुरावा केला असल्याने त्यांच्या प्रयत्नाला लवकरच यश मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी अटल सेतू सुरू झाल्याने काही मिनिटांतच मुंबईला पोहचणे शक्य होत आहे. या सेतुवरून बेस्ट बस सेवा सुरू करावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. यानंतर बेस्ट बसच्या ४ बसची ट्रायलही उरण शहरात घेण्यात आली. या प्रीमियम बससेवेनंतर सामान्यांची एसटी बसही या मार्गावर चालविण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करीत आहे. त्यामुळे सामान्य बसच्या तिकीट दरा इतकाच या बसचा दर असेल असे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ही बस सेवा सुरू केल्यानंतर प्रतिसाद चांगला मिळाला तर या मार्गावर बेस्ट बस गाड्यांची संख्या व फेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. या सेतुवरून बस कोणत्या मार्गाने व कधी जाईल याचे वेळापत्रक ठरविण्याचे काम सुरू आहे. यामुळे मात्र ज्यांची या सेतुवरून जाण्याची इच्छा आहे, परंतु चारचाकी नसल्याने अधुरे राहिलेले स्वप्न लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

याबाबत रविवारी बेस्टच्या बस उरण शहरात येऊन त्यांनी किती वेळ व रूट कशाप्रकारे असेल याची चाचपणी केली आहे. यानंतर लवकरच उरणमधून बेस्ट बसचा प्रवास अटल सेतुवरून सुरू होणार असल्याचे अधिकारी वर्गानी सांगितले. अटल सेतुवरून प्रवास करताना मनलुब्ध नजारा पाहण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!