गणेश पवार
कर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिकनपाडा साळोख मार्गानी दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मॅक्स सुपर कॅरी मॉडलचा मिनी टेम्पोमधून चार गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या टेम्पोला कर्त्यव्यावर दक्ष असणारे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आल्यामुळे चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचले आहे. तर सदर टेम्पो व गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन सदर टेम्पो सोडून पळून गेलेल्या आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन, पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ फेब्रुवारी २०२४ रोजी ५ वाजण्याचे सुमारास नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिकनपाडा साळोख या मार्गाने मॅक्स सुपर कॅरी मॉडलचा मिनी टेम्पो क्रमाक एमएच ०५ इएल ८६१९ हा जात असताना कर्त्यव्यावर असणारे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांनी पाहिले व त्यांना संशय आला असता त्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवत चालक व क्लीनर याला गाडीची पाहणी करायची आहे असे सांगितले. चालक व त्याच्या बरोबर असलेली व्यक्ती अशा दोघांनी चकवा देत त्या ठिकाणावरून पळून गेले. तर सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता, त्यामध्ये गोवंशीय जातीची तांबडया रंगाची आखुड शिंगे असलेली मोठया पोटाची गाय अंदाजे वय ७ वर्षे, काळया रंगाचा आखुड शिंगाचा बैल वय अंदाजे वय ५ वर्षे, काळ्या रंगाचे शिंगे फुटलेले वासरू वय अंदाजे दीड वर्षे व तांबूस रंगाची शिंगे नसलेली काळवट अंदाजे वय ६ महिने असे चार जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी सदर बाब हि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांना सांगितली असता विलंब न लावता त्यांनी चिकनपाडा येथे भेट देऊन पाहणी करून आरोपींनी आपसात संगनमत करून कोठून तरी एकूण ५०,००० /-रुपये किमतीची गोवंषीय जनावरे स्वतःच्या फायद्याकरिता चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता, क्रूरपणे वागणूक देऊन ती कत्तल करण्याच्या उदेशाने नेत असल्याचे समोर आल्याने फरार आरोपी यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २९ / २०२४ भा.दं.वि.क. ३७९,३४ प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा १९७६ चे कलम ११ ( १ ) ( G ) ( D ) (J) , ५ (A) (B), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई समीर लोंढे हे करीत आहेत. पोलीसांच्या या कामगिरीबाबत पोलीसांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.