महाड राष्ट्रवादीमधील गटबाजी चव्हाट्यावर
मिलिंद माने
महाड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी ते रायगड स्वराज्य सप्ताह रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेचे स्वागत महाडमध्ये केले गेले तर या सप्ताहाचा समारोप किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमाकडे चक्क रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामधील कार्यकर्त्यांची देखील गैरहजेरी दिसून आली. यावरून पक्षांतर्गत गटबाजी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर शिवजयंतीच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्वराज्य सप्ताहाचा समारोप रायगडावर करण्यात आला. या सोहळ्याकरता किल्ले रायगडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रूपाली चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विधिवत पूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शाहिरी पोवाडे, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. मात्र, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगडमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. शिवजयंतीच्या निमित्ताने दाखल झालेल्या शिवप्रेमींच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते फारच तुरळक प्रमाणात दिसून आले. त्याचप्रमाणे महाडमधील देखील प्रमुख कार्यकर्त्यांची किल्ल्यावर गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विद्यमान खासदार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या काळात धक्का देणारी ठरणार आहे.
महाड राष्ट्रवादीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा यावेळी रायगडावर ऐकण्यास मिळत होती. किल्ले रायगडावर झालेल्या कार्यक्रमाला महाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश महाडिक यांच्या व्यतिरिक्त तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. यामुळे आधीच दोन गटात विभागलेली राष्ट्रवादी आता पुन्हा गटातटात विभागते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
सदर कार्यक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असला तरी या ठिकाणी सुनील तटकरे मित्र मंडळ आणि महाडमधील काही नवख्या कार्यकर्त्यांचा उत्साह समोर आल्याने जुने जाणते कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा समोर आली आहे. सोशल मीडियावर पक्षाच्या ग्रुपवर झालेल्या या चर्चेमध्ये एकमेकांवर शाब्दिक हल्ला चढवल्याचे देखील एका कार्यकर्त्यांनी सांगितले. आज झालेल्या या कार्यक्रमामुळे अजित पवार गटाच्या महाडमधील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नाराजी समोर आली आहे.
32 रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा लढवण्याचे संकेत दोनच दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी जाहीर केले होते. असे असताना दोन दिवसाचा अवधी जातो न जातो तोच राष्ट्रवादीमधील मतभेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वतःच्याच कार्यक्रमात उघड झाल्याने पक्षातील गटबाजीमुळे लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीला जड जाणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.