किरण लाड
नागोठणे : भाजप पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमावलीच्या अधिन राहून रिलायन्स कंपनीच्या मैदानावर आयोजित महिलांच्या भव्य कबड्डी स्पर्धेत कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल (अ) संघाने बाजी मारुन ‘नमो चषका’वर आपले नाव कोरले आहे.
प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या भव्य कबड्डी स्पर्धा रविवार, दि.18 फेब्रुवारी रोजी रिलायन्स कंपनीच्या मैदानावर आयोजित केल्या होत्या. या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला महिला कबड्डी संघाबरोबर क्रिडारसिकांचा मोठा उत्साह बघायला मिळाला. अंतिम सामना कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अ संघ व ओमकार वेश्वी संघात झाला. या थरारक सामन्यात कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल अ संघाने बाजी मारली. तसेच व्दितीय क्रमांकाचा मानकरी वेश्वीचा ओमकार कबड्डी संघ ठरला. तृतीय तसेच चतुर्थ क्रमांकाचे मानकरी अनुक्रमे बिल्लेश्वर किहिम व कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल ब संघ ठरला आहे.
सर्वात्कृष्ट कबड्डी खेळाडू कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल संघाची रश्मी पाटील ठरली तर, संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट पक्कडीचा मान ओमकार वेश्वी संघाच्या श्वेताने पटकाविला. किहिम संघाच्या चैताली पाटीलने उत्कृष्ट चढाईचा मान पटकाविला. पब्लिक हिरोचा मान पनवेल संघाच्या पायलने पटकाविला. तर संपूर्ण स्पर्धेत आपल्या खेळाने खेळाचा रंग पलटविणाऱ्या ओमकार संघाच्या ईशा पाटीलने गेम चेंजरचा किताब पटकाविला. या महिला कबड्डी स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही संघाकडून फी स्विकारली गेली नाही. तसेच खेळाडूंना जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी संघाला मानधन व पराभूत संघाला आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
प्रेक्षकांना कबड्डी खेळाचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळाने आयोजित केलेल्या महिलांच्या कबड्डी स्पर्धा उत्कृष्ट नियोजनामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, क्रिडारसिकांच्या भरघोस प्रतिसादात मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.