गणेश पवार
कर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर सोमवारी पहाटे जैन साध्वी व सेवेकरी महिला असे पायी येत असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. यामध्ये जैन साध्वी व एक महिला सेवेकरी यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक महिला सेवेकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तब्बल ३० तास त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज आज अपयशी ठरल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
दि. १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी व इतर सेवेकरी असे एकूण १२ लोक कर्जतवरून नेरळकडे विहार करत पायी येत होते. त्याचवेळी नेरळकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका दुधाच्या टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये साध्वी मौलिक पुराणश्रीजी व लता संदीप ओसवाल यांचा मृत्यू झाला. तसेच दिवाली संजय ओसवाल या गंभीर जखमी झाल्याने त्यांना पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. यातील जखमी असलेल्या सेवेकरी दिवाली संजय ओसवाल यांनी तब्बल तीस तास मृत्यूशी झुंज दिली मात्र, ती झुंज आज अपयशी ठरली आहे. आज दि. २० फेब्रुवारी रोजी त्यांचाही मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या घटनेबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ३१४,१८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/ सतीश शिंदे हे करीत आहेत. कर्जत पोलिसांनी तात्काळ सदर वाहनाचा शोध सुरु केला होता. तसेच कर्जत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने टेम्पोचा शोध घेऊन तुर्भे येथून चालक रामशंकर छोटेलाल सेन याला ताब्यात घेतले आहे.