• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोयनाड येथे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

ByEditor

Feb 22, 2024

प्रतिनिधी
पोयनाड :
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती पोयनाड तर्फे १९ फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती पोयनाड येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सव समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, सचिव किशोर तावडे, खजिनदार देवेंद्र केळुस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

१९ फेब्रुवारीला सकाळी शिवप्रतिमेचे पूजन पोयनाड ग्रामपंचायतीचे मा. सरपंच भूषण चवरकर यांनी केले. यावेळी पोयनाड गावातील सर्व शिवप्रेमी उपस्थित होते. त्यानंतर पोयनाड येथिल ज्येष्ठ नागरिकांनी भजन सेवा करून महाराजांना मानवंदना दिली. दुपारी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागातील शिवप्रेमींनी संगीतखुर्ची स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतला. सायंकाळी शिवप्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक संपूर्ण पोयनाड गावातून निघाली. रा. जि. प. प्राथमिक शाळा मांडवा येथील लेझीम पथकांनी मिरवणुकीत आपली कला सादर करून भारतीय संस्कृतीचे व परंपरेचे प्रदर्शन घडविले. “जय भवानी जय शिवराय” या घोषणांनी पोयनाड बाजारपेठ दणाणली.

दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारीला सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोयनाडच्या युवा मुलामुलींनी आपली नृत्यकला सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. पोयनाड गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा ह्यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेट पॅनल पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेले ॲड. पंकज पंडित, फिजियो डॉक्टरेट मिळालेली डॉ. जिना प्रदिप जैन, सर्पमित्र अनिकेत संदेश चवरकर, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्राप्त केलेल्या अद्वैत देवेंद्र केळुस्कर, एमबीए झालेल्या सौरभ दिलीप कारेकर यांचा सत्कार उत्सव समिती तर्फे करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष सुनिल पाटील, सचिव किशोर तावडे, खजिनदार देवेंद्र केळुस्कर, अर्चना चवरकर यांच्यासह पोयनाड विभागातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!