मोटारसायकल चोरांसह दहा मोटारसायकल हस्तगत
मिलिंद माने
महाड : महाडमधून मोटरसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला महाड औद्योगिक पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार इतर मोटरसायकल चोरांना देखील अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध ठिकाणावरून चोरलेल्या बाईक ताब्यात घेतल्या आहेत.
महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात महाड एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. यामुळे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मारुती आंधळे आणि त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडमधून मोटरसायकल चोरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका चोराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अन्य दोघांना इतर ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांकडून विविध ठिकाणी चोरलेल्या आणि विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटारसायकल देखील महाड औद्योगिक पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
महाड औद्योगिक वसाहतीच्या पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे महाड परिसरामध्ये कौतुक केले जात आहे. दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास रुपेश शंकर पवार, रा. टेमघर यांनी त्यांच्या मालकीची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल घराच्या अंगणात पार्किंग केली असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार तपास केला असता आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार सागर विरेंद्र सिंग सोळंकी, रा. आदर्श नगर, बिरवाडी याला शिताफीने पकडण्यात आले. त्यानंतर त्याने युवराज विठोबा जगताप (27), सुहास रमेश नाईलकर, रा, रुपवली यांची नावे सांगितल्यानंतर त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून विविध ठिकाणी विक्री झालेल्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. या सर्व मोटरसायकल भिवंडी, प्रतापगड, मंडणगड, रुपवली, महाड, साकडी, कुसगाव, चिंबावे, येथून ताब्यात घेतल्या आहेत. या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे, पोलीस हवालदार राजेश गोरेगावकर, सिद्धेश मोरे, राजेश माने, सतीश बोटे, शितल बंडगर, पवन बारवकर यांनी विशेष मेहनत घेतली.
आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्यावर भादवि कलम 379 प्रमाणे पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड औद्योगिक वसाहतीतील पोलीस ठाणे ज्याप्रकारे गुन्ह्यांचा तपास मार्गी लावते मात्र महाड शहर व महाड तालुका पोलीस ठाण्यांना घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात नेहमीच का अपयश येत आहे? असा सवाल महाड शहरातील व तालुक्यातील नागरिक जिल्हा पोलीस प्रशासनाला विचारीत आहेत.