घनश्याम कडू
उरण : उरण पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार उघड केल्याबद्दल उरणच्या रणरागिणींचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यापुढे लवकरच उरण पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार उघड होण्यासाठी गावागावातील जागृत नागरिक पुढाकार घेणार आहेत.
युवा सामाजिक संस्था जसखारच्या रणरागिणी उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे आणि सर्व महिला सदस्यांनी ग्रामस्थांना दाखवून दिले कि, कोणतेही काम करण्यासाठी इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे. मागील आठ महिन्यापूर्वी ठराव झालेल्या गावातील विकासकामाची मंजुरी मिळण्यासाठी पैसे द्यावे लागतील तरच कामाचे इस्टीमेट मिळतील असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांना लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडून दाखविले आहे. सदर महिलांनी कोणतीही लाच न देता स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी पाठपुरावा करून जवळपास 1 कोटी रकमेची विकासकामे जसखार ग्रामस्थांकरिता मंजूर केली. तसेच भ्रष्ट अधिकारी यांना वठणीवर आणल्या बद्दल सर्व ग्रामपंचायत महिला सदस्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
उरण पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणून अधिकाऱ्यांना अद्दल घडविल्याने इतर अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत. आता तालुक्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांविरोधात लवकरच जागृत नागरिक मोहीम उघडणार असल्याचे समजते.